12 तासांत जबरी चोरीचे आरोपी गजाआड
तिघांना अटक, एक अल्पवयीन

-फ्रेजरपुरा पोलिसांची धडक कारवाई
अमरावती / 31 जुलै : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने फक्त 12 तासांच्या आत जबरी चोरीच्या घटनेतील तीन आरोपींना ताब्यात घेत महत्त्वाची कामगिरी केली आहे. भीमटेकडी येथील पाण्याच्या टाकीजवळ पादचारी देवानंद खंडारे यांना चाकूच्या बळावर लुटण्यात आले होते. त्याप्रकरणात पोलिसांनी ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश उर्फ मजनू प्रविण गडलिंग, प्रथमेश उर्फ शानू विजय शिंदे आणि एका अल्पवयीनाचा समावेश आहे. पोलिसांनी आरोपींकडून वीवो व नोकिया कंपनीचे मोबाईल हँडसेट, 800 रुपये रोख, आणि स्टीलचा चाकू असा एकूण 15,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देवानंद खंडारे हे आपले काम आटोपून बेनोडा चौकातून घरी पायी जात असताना, तीन आरोपींनी त्याचा पाठलाग करून चाकू दाखवून धमकी दिली. त्यानंतर त्याच्याकडील दोन मोबाईल हँडसेट व 1,000 रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून घेतली. घटनेनंतर खंडारे यांनी त्वरित फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला. घटनेच्या ठिकाणी तपास करत असताना, पोलिसांना यश उर्फ मजनू याच्या संलग्नतेचा सुगावा लागला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर, इतर दोघे आरोपी देखील पकडले गेले. या यशस्वी कारवाईसाठी पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वाखालील पथकात निरीक्षक नीलेश गावंडे, उपनिरीक्षक राहुल महाजन, सहायक उपनिरीक्षक योगेश श्रीवास, तसेच पोलीस कॉन्स्टेबल सुभाष पाटील, शशिकांत गवई, सूरज यादव, हरीश चौधरी, सचिन बोरकर, सागर चव्हाण, जावेद पाटेल, जयश परिवाले, प्रशांत वानखडे, रोशन वर्हाडे आणि उमेश चूलपार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.




