तरुणाची भरदिवसा चाकूने भोसकून हत्या
गांधी आश्रम चौकात जुन्या वादातून घडले हत्याकांड

* निवडणूक रॅली सुरू असतानाच परिसरात घडली घटना
अमरावती /11 जानेवारी – शहरातील गांधी आश्रम चौक परिसरात रविवार रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास एका 18 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. नयन नरेंद्र वायधने (रा. हनुमान नगर) असे मृताचे नाव असून, दोन सख्या भावांनी मिळून हा हल्ला चढवला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नयन वायधने हा रविवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास गांधी आश्रम चौकातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळून पायी जात होता. याच वेळी परिसरात एका उमेदवाराची प्रचार रॅली सुरू होती. गर्दीचा फायदा घेत तेथे आधीच दबा धरून बसलेल्या दीपक ईश्वर तायडे (35) आणि सागर ईश्वर तायडे या दोन भावांनी नयनला गाठले. जुन्या वैमनस्यातून दोघांनी नयनवर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली.
आरोपी दीपकने नयनच्या पोटावर आणि पाठीवर 7 ते 8 वार केले. या भीषण हल्ल्यात नयन गंभीर जखमी होऊन जागीच कोसळला. प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक असतानाही ही घटना घडल्याने परिसरात प्रचंड पळापळ आणि घबराट पसरली. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. नयनला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त श्याम घुगे, गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचे पंचनामे केले असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. सध्या पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
मृतक नयनचा गुन्हेगारी इतिहास आणि हत्येचे कारण
पोलीस तपासात समोर आले आहे की, मृत नयन वायधने हा स्वतः गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न आणि मारहाणीचे गुन्हे दाखल होते. दिवाळीच्या वेळी एका घटनेत तो बालसुधार गृहातही जाऊन आला होता. आरोपी दीपक तायडे आणि नयन यांच्यात काही काळापासून टोकाचा वाद सुरू होता, ज्याचा शेवट आज या रक्तरंजित घटनेने झाला.




