तरुण व्यापार्‍याची दुकानात आत्महत्या

अंबादेवी रोडवरील घटना

* मृत तरुणाची सुसाईड नोट जप्त

अमरावती /22 जानेवारी : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गजबजलेल्या अंबादेवी रोडवर एका 28 वर्षीय तरुण कापड व्यापार्‍याने आपल्याच दुकानात गळफास लावून जीवनयात्रा संपवली. आशीष दिनेश शुक्ला असे मृत तरुणाचे नाव असून तो विलास नगर येथील रहिवासी होता. ही हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली असून, घटनास्थळावरून पोलिसांनी एक चिठ्ठी जप्त केली आहे.
या घटने मुळे संपूर्ण व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून शहरात हळ हळ व्यक्त केली जात आहे. सविस्तर वृत्त असे की, आशीष शुक्ला यांचे अंबादेवी मार्गावर ‘बिग डॅडी स्टोअर’ नावाचे कपड्यांचे दुकान आहे. बुधवारी दुपारपासूनच या दुकाचे शटर बंद असल्याने परिसरातील इतर दुकानदारांना शंका आली नाही. मात्र, घरी आशीषचा भ्रमणध्वनी बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. घरच्यांनी तातडीने दुकानावर धाव घेतली आणि शटर उघडून आत प्रवेश केला असता, आशीष गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा धक्कादायक प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह खाली उतरविला. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठीबाबत पोलीस कमालीची गुप्तता पाळत असून, तपास अधिकारी सध्या यावर काहीही बोलण्यास तयार नाहीत. मात्र, प्राथमिक चर्चेनुसार आर्थिक अडचणींमुळेच आशीषने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास चक्राकार पद्धतीने सुरू केला आहे. या घटनेने शुक्ला परिवारावर दुखाचा डोंगर कोसळला असून तरुण व्यापार्‍याच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
तपासाचे चक्र आणि गुपित चिठ्ठी-आशीषने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे, जी आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या चिठ्ठीत नेमके काय लिहिले आहे, याबाबत कोतवाली पोलीस सध्या कमालीची गोपनियता पाळत आहेत. ठाणेदार मनोहर कोटनाके यांनी यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी, या चिठ्ठीतून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button