तस्करांशी भिडण्यासाठी महिलेला केलं पुढं; प्रशासनाची ही कसली मर्दुमकी?
खाकीचा धाक नाही की कायद्याचा दरारा? संवेदनशून्य अधिकार्यांचा गलथान कारभार

परतवाडा / 17 मार्च : स्थानिक परतवाडा ते बैतूल या मृत्यूच्या महामार्गावर गौण खनिजांची अवैध लूट रोखण्यासाठी प्रशासनाने तपासणी नाका तर थाटला, पण या ठिकाणी चक्क एका महिला महसूल सेवकाला तस्करांच्या विळख्यात उभे करून आपल्याच कर्मचार्याचा बळी देण्याचा घाट घातला आहे.
रणरणते ऊन, सोयीसुविधांचा पत्ता नाही आणि डोळ्यासमोर वावरणारे हिंस्त्र खनिज माफिया, अशा जीवघेण्या स्थितीत एका महिलेला कोणत्याही सुरक्षेशिवाय झुंजायला लावून महसूल विभागाने आपल्या नाकर्तेपणाचे जाहीर प्रदर्शन केले आहे. महिलांच्या सन्मानाचा ढोल बडवणार्या प्रशासनाचा हा क्रूर चेहरा पाहून आता संताप व्यक्त होत असून, ही तपासणीची जबाबदारी आहे की सुरक्षेची बेफिकिरी? असा जळजळीत सवाल विचारला जात आहे. परतवाडा-बैतूल या मार्गावर रेती, गिट्टी आणि मुरुमाची तस्करी करणारे माफिया रात्रंदिवस धुमाकूळ घालत असतात. एकाच पावतीवर दहा फेर्या मारणे आणि कायद्याला पायदळी तुडवणे हा येथील नित्याचाच प्रकार आहे. यापूर्वी याच मार्गावर महसूल विभागाच्या पथकांवर आणि प्रामाणिक अधिकार्यांवर तस्करांनी जीवघेणे हल्ले चढवले आहेत, गाड्या अंगावर घालण्याचे प्रयत्न झाले आहेत. अशा भीषण आणि संवेदनशील ठिकाणी जिथे सशस्त्र पोलिसांची गरज आहे, तिथे एका हतबल महिला कर्मचार्याला दहा बाय दहाच्या कापडी तंबूत बसवून प्रशासनाने नेमके काय साध्य केले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या महिला महसूल सेवकासोबत कोणताही पुरुष सहकारी किंवा साधा शिपाई देखील तैनात नसल्याने, जर भररस्त्यात तस्करांनी हल्ला केला किंवा काही अघोरी कृत्य केले, तर त्याला जबाबदार कोण? जिल्हाधिकार्यांचा आदेश आहे की स्थानिक तहसीलदारांची ही मनमानी, असा संशय आता बळावला आहे. या तपाणी नाक्यावर माणुसकीचा लवलेशही उरलेला नाही. भर उन्हात तापणार्या त्या तंबूत पिण्याच्या पाण्याची साधी सोय नाही की नैसर्गिक विधीसाठी स्वच्छतागृह नाही. दिवसभर तहान-भूक विसरून आणि आरोग्याची आहुती देऊन ही महिला कर्मचारी प्रशासनाचा ’तमाशा’ सहन करत आहे. प्रशासनाच्या या अघोरी निर्णयामुळे या महिलेला प्रचंड मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. तस्करी रोखण्याच्या नावाखाली एका स्त्रीला अशा असुरक्षित जाळ्यात ढकलणे हा प्रशासकीय दहशतवादच म्हणावा लागेल. गावखेड्यातील जनता या प्रकारामुळे कमालीची संतप्त झाली असून, कर्तव्याच्या नावाखाली महिलेचा बळी देऊ नका, असा इशारा आता दिला जात आहे. वरिष्ठ महसूल अधिकार्यांनी तात्काळ एसी केबिनमधून बाहेर पडून या महामार्गावरील वास्तव पाहावे आणि त्या महिला कर्मचार्याची या नरकयातनेतून सुटका करावी, अन्यथा या बेजबाबदारपणाचा जाब जनतेच्या दरबारात द्यावा लागेल.
प्रशासनाची भूमिका-संबंधित ठिकाणी महिला कर्मचारी एकटी नसून तिच्यासोबत महसूल सेवक, तलाठी, पोलीस पाटील यांची चमू आळीपाळीने कार्यरत आहे. उन्हापासून संरक्षणासाठी तिथे तात्पुरता मंडप उभारण्यात आला असून गौण खनिज चोरी रोखण्यासाठी प्रशासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे.
– बळवंत अरखराव (उपविभागीय अधिकारी, अचलपूर)
महिलांना धोक्यात टाकू नका

निर्जन स्थळी महिलांची ड्युटी लावणे अत्यंत चुकीचे आहे. तिथे किमान दोन महिला कर्मचारी आणि मूलभूत सुविधा असणे अत्यावश्यक आहे. अधिकार्यांनी सुरक्षेचे गांभीर्य समजून घ्यावे आणि भविष्यात अशा प्रकारच्या चुका पुन्हा करू नयेत, हीच आमची मागणी आहे.
– नयनाताई जोशी (जिल्हा महामंत्री, भाजप)
निष्काळजीपणाचा नमुना

तपासणी मोहिमेचा उद्देश योग्य असला तरी अंमलबजावणी करताना महिला सुरक्षा आणि सुविधांकडे दुर्लक्ष करणे गंभीर आहे. जोखमीचे व्यवस्थापन न करता राबवलेली ही मोहीम प्रशासनाच्या कार्यक्षमतेपेक्षा त्यांच्या निष्काळजीपणाचाच मोठा दाखला ठरत आहे.
– प्रितेश अवघड (जिल्हा उपाध्यक्ष, शिवसेना-शिंदे गट)




