मनपात परिवर्तनाचे वादळ आणि नव्या दमाची सत्ता
अनुभवी दिग्गजांना धक्का देत 54 नवख्या शिलेदारांची ऐतिहासिक एन्ट्री

* महिला शक्तीचा हुंकार आणि प्रस्थापित सत्ताधीशांचा राजकीय अस्त
अमरावती /19 जानेवारी : शहराच्या राजकीय पटलावर मतदारांनी परिवर्तनाचा महासिंहावलोकन घडवून आणले असून प्रस्थापित सत्ताधीशांच्या तटबंदीला सुरुंग लावला आहे. 15 जानेवारीला पार पडलेल्या मतदानानंतर 16 जानेवारीला जाहीर झालेल्या निकालांनी शहरात बदलाची मोठी लाट असल्याचे सिद्ध केले. 22 प्रभागांमधील 87 सदस्यीय महापालिका सभागृहात यंदा तब्बल 54 नवीन चेहर्यांनी पहिल्यांदाच प्रवेश मिळवला आहे. अनुभवी नेत्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या आणि तरुण नेतृत्वावर विश्वास दाखवत अमरावतीच्या जनतेने लोकशाहीचा नवा अध्याय लिहिला आहे. यात महिलांच्या 31 आणि पुरुषांच्या 23 जागांवर नवख्या उमेदवारांनी मिळवलेला विजय हा प्रस्थापितांना मोठा इशारा मानला जात आहे.
अमरावती महापालिकेच्या या निवडणुकीत मतदारांनी अत्यंत प्रगल्भता दाखवली आहे. 50 टक्के आरक्षणाची अट असतानाही प्रत्यक्षात 46 महिलांनी विजय मिळवून सभागृहात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, दोन महिलांनी खुल्या प्रवर्गातून विजय संपादन करून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या निकालाने हे स्पष्ट केले आहे की, आता जनता केवळ पक्षाच्या चिन्हावर किंवा जुन्या नावारूपावर अवलंबून नसून, तिला कामाचा नवा दृष्टिकोन हवा आहे. 54 नवीन नगरसेवकांच्या रूपाने महापालिकेला आता एक नवी ऊर्जा आणि कार्यपद्धती लाभणार आहे. नव्याने निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींसमोर आता आव्हानांचा डोंगर उभा आहे. प्रामुख्याने प्रभागातील रखडलेले रस्ते, पाणीपुरवठ्याचे विस्कळीत नियोजन आणि कचरा व्यवस्थापनाची बिकट समस्या सोडवणे ही त्यांची पहिली परीक्षा असेल. नवोदित नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नसला, तरी त्यांच्याकडे विकासाची जिद्द आणि लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. पालिकेच्या अंदाजपत्रकीय तरतुदींचा अभ्यास करून आपल्या प्रभागासाठी जास्तीत जास्त निधी मिळवणे आणि तो पारदर्शकपणे खर्च करणे, हे या नव्या शिलेदारांचे मुख्य कौशल्य ठरेल.महापालिका सभागृहात केवळ उपस्थिती लावण्यापेक्षा प्रभागातील समस्यांचा आवाज प्रभावीपणे मांडणे ही नगरसेवकाची खरी जबाबदारी असते. महिला नगरसेवकांची वाढती संख्या ही शहराच्या सामाजिक सुरक्षेसाठी आणि कौटुंबिक प्रश्नांच्या निवारणासाठी आशादायी चित्र निर्माण करणारी आहे. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणासारख्या विषयांवर या नव्या नगरसेवकांनी लक्ष केंद्रित केल्यास अमरावती शहराचा चेहरामोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. विशेषतः केंद्र आणि राज्याच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रतिनिधींना प्रशासनाशी कठोर संघर्ष करावा लागेल. या निवडणुकीने हे देखील शिकवले आहे की, जनता आता केवळ निवडणुकांपुरत्या दर्शनावर समाधानी नाही. मतदारांनी ज्या अपेक्षेने नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता सोपवली आहे, ती सार्थ ठरवण्यासाठी नगरसेवकांना सतत जनसंपर्कात राहावे लागेल. अनधिकृत बांधकामांना पायबंद घालणे, अतिक्रमण मुक्त रस्ते आणि आधुनिक सुविधांनी युक्त उद्याने विकसित करणे ही शहराची गरज आहे. अमरावतीकरांनी दिलेला हा कौल केवळ बदलासाठी नसून तो पारदर्शक आणि गतिमान विकासासाठी आहे. त्यामुळे आगामी पाच वर्षांचा काळ हा या नवीन 54 नगरसेवकांच्या कर्तृत्वाची कसोटी पाहणारा ठरेल.
स्त्रीशक्तीचा ऐतिहासिक विजयोत्सव
अमरावती महापालिकेत आरक्षणाच्या मर्यादा ओलांडून 46 महिलांनी मिळवलेला विजय हा स्त्रीशक्तीचा गौरव आहे. खुल्या प्रवर्गातून दोन महिलांनी दिलेली झुंज आणि मिळवलेला विजय ही बाब राजकारणातील पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देणारी ठरली आहे. महिलांच्या या भरीव उपस्थितीमुळे शहराच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आता संवेदनशीलतेचा आणि सर्वसमावेशक विकासाचा नवा विचार पाहायला मिळेल, यात शंका नाही.




