दर्यापूर परिसरात तीन दिवसांपासून अपघातांची मालिका

गोळेगावजवळ दुचाकींची धडक; दोघांचा मृत्यू

दर्यापूर / 4 नोव्हेंबर तहसील परिसरात गेल्या तीन दिवसांपासून रस्ते अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी दर्यापूर-मूर्तिजापूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर आज पुन्हा दर्यापूर-अकोला मार्गावर गोळेगावजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची नावे मंगेश जायले (रा. अमरावती) आणि गणेश पांडुरंग राठोड (रा. टाकोंकरपुरा, दर्यापूर) अशी आहेत. मंगेश जायले हे अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या डॉ. जाधव यांचे चालक म्हणून कार्यरत होते. ते काही कामानिमित्त दर्यापूर-अकोला रस्त्याने गोळेगावकडे जात असताना, विरुद्ध दिशेने येणार्‍या गणेश राठोड यांच्या दुचाकीला त्यांची समोरासमोर धडक बसली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी सुनील वानखडे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत झालेल्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने रस्त्यांवरील सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी मागणी केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button