तब्बल नऊ फूटाच्या अजगराला जीवनदान!

तिवसा / 25 ऑगस्ट : तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीमध्ये तसेच खेड्यापाड्यात पाणी साचले आहे. त्यामुळे साप, अजगर अशा सरपटणार्‍या प्राण्यांच्या हालचाली वाढल्या असून ते सुरक्षित ठिकाण शोधताना मानव वस्त्यांमध्येही शिरताना दिसत आहेत. अशाच एका थरारक घटनेत तिवसा तालुक्यातील सातरगाव रोडवरील विटभट्टी परिसरात तब्बल नऊ फूट लांबीचा अजगर दिसल्याने एकच खळबळ उडाली.
घाबरलेल्या गावकर्‍यांनी तातडीने सर्पमित्र वैभव पतंगराय यांच्याशी संपर्क साधला. ते क्षणाचा विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाले आणि कौशल्यपूर्ण पद्धतीने अजगराला सुरक्षितरीत्या पकडले. नागरिकांच्या सुरक्षिततेसह प्राण्याचेही प्राण वाचविण्यात यशस्वी ठरत, त्यांनी अजगराला वनविभागाच्या नोंदीनुसार सुरक्षित ठिकाणी सोडले. या थरारक बचाव मोहिमेच्या वेळी नगरसेवक आशिष ढोले, संदीप ढोबाळे, वैभव शापामोहन, प्रशांत ढोले, शैलेश रामटेके आदी उपस्थित होते. तिवसा शहरातील सजग सर्पमित्रांच्या कार्याची सर्व स्तरांतून प्रशंसा होत असून, निसर्गाशी सुसंगत सहजीवनाचे हे उत्तम उदाहरण अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button