माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यातून सुवर्ण आठवणींचा शालेय प्रवास

अमरावती /14 जानेवारी : सन 1990 ते 2010 या कालखंडात शिक्षण घेतलेले आणि आज समाजाच्या विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत असलेले हजाराहून अधिक माजी विद्यार्थी या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या शाळेत परतले. बालपण, मैत्री, खोडकरपणा, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील प्रत्येक क्षण आठवताना अनेकांच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळले.
माजी विद्यार्थी आपल्या जुन्याच वर्गखोल्यांत जाऊन बसले, बाकांवर हात फिरवला, फळ्यावर नजर टाकली आणि जणू काळ मागे फिरल्याचा अनुभव सर्वांनी घेतला. शिक्षकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत जुन्या आठवणी जागवल्या. गुरुजींचा एक शब्द आणि शाळेतील एक दिवसही आयुष्य घडवतो याची प्रचिती या मेळाव्यात प्रत्येकाला आली. हा क्षण होता, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळद्वारा संचालित श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याचा. रविवार दि. 11 जानेवारी 2026 हा दिवस श्री रामकृष्ण क्रीडा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाणारा ठरला. तब्बल अनेक वर्षांनंतर विद्यालयाच्या पावन प्रांगणात भरलेला भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर तो आठवणी, भावना, ऋणानुबंध आणि गुरु-शिष्यांच्या पवित्र नात्यांचा हृद्य संगम होता. या भावनिक सोहळ्याला संस्थेच्या सचिव प्रा. डॉ. माधुरीताई चेंडके, शिक्षण उपसंचालक नीलिमाताई टाके, विद्यालयाचे माजी प्राचार्य, माजी शिक्षकवृंद व अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. माजी विद्यार्थी कार्यकारिणीने या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाची भूमिका बजावली. संघाचे कोषाध्यक्ष क्षितिज दीक्षित यांनी आर्थिक व्यवस्थापन अत्यंत समर्थपणे सांभाळले. कार्यक्रमाची तांत्रिक जबाबदारी नितीन गवई व नीरज हिरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. संचालन सुरज हिरे व उज्वला देवकर यांनी अत्यंत प्रभावी व भावस्पर्शी शैलीत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या ममता वाडेगावकर यांनी सादर केले. त्यांच्या शब्दांतून शाळेबद्दलचा जिव्हाळा व्यक्त होताच संपूर्ण वातावरण भावूक झाले आणि अनेक माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले.

संबंधित बातम्या

Back to top button