छत्रपती शिवाजी महाराजांचा चिखलदर्यात भव्य पुतळा साकारणार
बुद्धांची मूर्ती व देवी पॉईंट मंदिर संवर्धनाचाही प्रस्ताव

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पुढाकार
चिखलदरा / 2 जानेवारी : विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणार्या चिखलदर्यात पर्यटन विकासाला गती देण्यासाठी नगरपालिकेने नवे आणि ठोस पावले उचलली आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख अब्दुल शेख हैदर आणि नगरसेवकांच्या पुढाकारातून आदिवासीबहुल मरियमपूर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, तथागत भगवान बुद्धांची मूर्ती, तसेच देवी पॉईंट येथील ऐतिहासिक मंदिराचे संवर्धन अशा महत्वाच्या योजना समाविष्ट आहेत. या माध्यमातून चिखलदर्याला राज्यासह देश-विदेशातील पर्यटकांचे प्रमुख केंद्र बनवण्याचा प्रयत्न आहे.
नगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात मरियमपूर परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जाणार आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात येणारा पुतळा हा केवळ स्मारक न राहता, चिखलदर्याची ओळख ठरेल, अशी रचना करण्यात येणार आहे. याचबरोबर तथागत भगवान बुद्धांच्या भव्य मूर्तीचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या विचाराधीन असून, सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यावर भर देण्यात आला आहे. नगराध्यक्ष शेख हैदर यांनी देवी पॉईंट येथील ऐतिहासिक मंदिराच्या संवर्धनाची जबाबदारी प्राधान्याने पूर्ण केली जाईल, असे स्पष्ट केले. या कामात नगरसेवक रुपेश चौबे, शैलेंद्र पाल यांच्यासह सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभणार आहे. पर्यटन हाच चिखलदर्याच्या विकासाचा मुख्य मार्ग असून, प्रत्येक नगरसेवक या दिशेने कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या महाराष्ट्र व लगतच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणावर पर्यटक चिखलदर्याला भेट देत आहेत. भविष्यात परदेशी पर्यटकांनाही आकर्षित करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत आहे. सुमारे 500-550 लोकसंख्या व 50 टक्के साक्षरता असलेले मरियमपूर हे गाव अमरावती जिल्ह्यापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी पोहोचण्यासाठी दळणवळणाची सोय उपलब्ध आहे. या विकास योजनांमुळे मरियमपूर आणि चिखलदरा पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




