मोसीकॉलच्या 10 एक्कर जमिनीवर भव्य मार्केट उभारावे
माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा मोलाचा सल्ला

* शहरातील वाढत्या वाहतूक समस्येंवर वेधले लक्ष
* 24 एकरातील 10 एक्कर जागा आरक्षित करण्याची मागणी
अमरावती /9 डिसेंबर : शहराचा व्याप झपाट्याने वाढत असतांना पुरातन इतवारा आणि शुक्रवार बाजार या दोनच पारंपरिक बाजारांवर वाढत्या लोकसंख्येचा आणि व्यापाराच्या ओघाचा प्रचंड ताण पडत आहे. गेल्या सात-आठ दशकांत शहराची लोकसंख्या अनेक पटींनी वाढली, दैनंदिन गरजांचा व्यापही दूरगामी पातळीवर विस्तारला. परंतु या वाढीस अनुसरून सार्वजनिक बाजारांचे नियोजन, विकसित रचना किंवा अतिरिक्त सुविधा निर्माण करण्याचे काम मात्र आजवर ठोसपणे झालेच नाही.
यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले, किरकोळ गरजांची दुकाने आणि इतर हॉकर्स यांचा पुन्हा पुन्हा वाढणारा सुळसुळाट वाहतूक व्यवस्थेला मोठ्या अडचणी निर्माण करीत आहे. अनेक भागांत सकाळ- संध्या
काळच्या महत्त्वाच्या वेळेत वाहन धारकांना मोठ्या
वाहतूककोंडीतून मार्ग काढावा लागत आहे. नागरिकांच्या तक्रारी वाढत असून प्रशासकीय दृष्टीनेही या अनियंत्रित व्यापामुळे शहरी नियोजनावर ताण वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती भागातील मोसीकॉलची उपलब्ध प्रचंड जागा ही अमरावतीसाठी एक अमूल्य संधी ठरू शकते, असे स्पष्ट आणि ठाम मत माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, शहराला अत्याधुनिक, सुसज्ज आणि व्यवस्थित नियोजित अशा नव्या सार्वजनिक बाजाराची तातडीने आवश्यकता असून मोसीकॉलची जागा त्यासाठी आदर्श ठरू शकते. डॉ. देशमुख पुढे म्हणाले की, ही जागा केवळ बाजाराच्या दृष्टीनेच नव्हे तर भविष्यातील शहर विकास आराखड्यासाठीही अत्यंत मोलाची आहे. विस्तृत भू-भाग, मध्यवर्ती स्थान, नागरिकांना सहज पोहोचता येईल अशी भौगोलिक सोय आणि वाहतुकीच्या दृष्टीने योग्य रचना अशा सर्व बाबी येथे उपलब्ध असल्याने या संकल्पनेवर गांभीर्याने विचार व्हायला हवा. त्यांच्या मते, शहरातील वाढता व्याप सुसूत्ररीत्या व्यवस्थापित करण्यासाठी नवे बाजार विकसित करणे आवश्यक आहे. यामुळे केवळ व्यापार्यांना नव्हे तर नागरिकांनाही सुसज्ज व्यवस्था मिळेल आणि जुन्या बाजारांवरील प्रचंड भार कमी होईल. परिणामी रस्तोरस्ती पसरणारा अनधिकृत व्याप, हातगाड्या आणि दैनंदिन गोंधळ यावर नियंत्रण येईल. वाहतूक सुलभ होऊन शहराचा चेहरामोहरा सुटसुटीत, स्वच्छ आणि गतिमान होईल.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीची गरज असल्याचे सांगत डॉ. देशमुख यांनी संबंधित यंत्रणांनी या कल्पनेवर तातडीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. त्यांच्या मते, मोसीकॉलची जागा योग्य रितीने विकसित झाली तर अमरावतीच्या व्यापार वर्गाला नवी दिशा मिळेल आणि येणार्या दशकांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरेल.
मोसीकॉलची 24 एकर जागा लिलावाच्या उंबरठ्यावर-चौधरी चौक ते विलास नगर मार्गावर डाव्या बाजूस, शहराच्या मध्यभागी असलेली महाराष्ट्र राज्य तेलबिया, व्यापार व औद्योगिक महामंडळाची (मोसीकॉल) तब्बल 22 ते 24 एकरांचा विस्तीर्ण भूखंड आहे. महामंडळाने ही जागा जसे आहे तसे, जिथे आहे तिथे, जे काही आहे ते, आणि कोणताही दावा नाही या तत्त्वावर विक्रीस काढण्याची निविदा नुकतीच जाहीर केली आहे. शहरातील नागरिकांच्या दृष्टीने ही केवळ जमीन नसून वाढत्या गरजांना उत्तर देऊ शकणारी अत्यंत महत्त्वाची सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे ही जमीन पूर्णपणे विक्रीस न काढता किमान दहा एकर जागा महानगरपालिकेद्वारे बाजारासाठी आरक्षित करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी अग्रक्रमाने केली आहे.
नवीन बाजारपेठेची नितांत गरज-इतवारा व शुक्रवारी बाजार या दोनच स्थळांवर शहराच्या सर्व भागातून होणार्या मोठ्या गर्दीमुळे ती ठिकाणे खचाखच भरलेली असतात. रस्त्यांवरील अनधिकृत विक्रेते, भाजीपाला विक्री करणारे हॉकर्स यामुळे अनेक मार्गांवर वाहतूक विस्कळीत होऊन अपघातांचाही धोका वाढत चालला आहे. मोसीकॉल परिसरात किमान दहा एकर जागेवर सुसज्ज व नियोजित बाजार उभारला गेल्यास शहरातील सर्वाधिक दबावग्रस्त मार्गांवरील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल. चौधरी चौक, कॉटन मार्केट, विलासनगर, गाडगेनगर परिसरातील वाहतुकीतील अडचणी सुटण्यासही मदत होईल.
मोसीकॉल शहराचा ऐतिहासिक वारसा…-एके काळी या परिसरात मोसीकॉलसह तिवसा जिनिंग फॅक्टरी, एदलजी फ्रॉमजी दोटीवाला, नेमानी, लढ्ढा इत्यादी अनेक जिनिंग-प्रेसिंग उद्योग फुलून आले होते. कापूस प्रक्रिया उद्योगांचा हा पट्टा अमरावतीच्या औद्योगिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग होता. परंतु काळाच्या ओघात हे उद्योग बंद पडत गेले आणि आता उरली-सुरली जमीनच विक्रीला काढली जात आहे.
पूर्वीही शेतकरी सहकारी जिनिंग-प्रेसिंग संस्थेची संपूर्ण जमीन व्यापारी हितसंबंधांसाठी वापरल्याची उदाहरणे नागरिकांच्या स्मरणात आहेत. त्यामुळे मोसीकॉलचा भूखंडही काही ठराविक गटांच्या व्यावसायिक फायद्याकरिता संपवला जाऊ नये, अशी जनतेत मोठी अपेक्षा आहे.
लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमावरही प्रश्नचिन्ह-अमरावतीसारख्या वाढत्या शहराला तिसरा मोठा बाजार अत्यंत आवश्यक आहे. परंतु या दिशेने लोकप्रतिनिधींकडून ठोस पावले उचलली जात आहेत की नाही, याबाबतच नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहे. व्यापारी संकुले, निवासी प्रकल्प बांधणे हाच विकास समजण्याची प्रवृत्ती वाढत असताना नागरिकांच्या दैनंदिन आवश्यक गरजांना न्याय देणारा सुसज्ज बाजार उभारणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मनपाने पुढाकार घेण्याची गरज-मोसीकॉलची उपलब्ध सरकारी जागा ही अमरावतीसाठी एक मोठी संधी आहे. किमान दहा एकर जागा आरक्षित करून नियोजित, आधुनिक आणि स्वच्छ बाजार उभारण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी महानगरपालिकेकडे केली आहे.शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केवळ उचित नाही तर शहराच्या भविष्यासाठी अत्यावश्यकही आहे.अमरावतीच्या विकासाला दिशा देणारा हा निर्णय आता लोकप्रतिनिधी व प्रशासन कोणत्या गांभीर्याने घेतात, हे येणार्या काळात स्पष्ट होणार आहे.
* टेंडर प्रक्रिया पारदर्शक असावी

मोसीकॉलच्या नव्या टेंडरमध्ये निविदेची किंमत मागील 25 हजार रुपयांवरून थेट 5 लाखांवर नेण्यात आल्याने ही वाढ कोणत्या तर्कावर आधारित आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्पर्धा टाळण्यासाठी अशी अट घातली गेली का, असा संशय होत आहे. अचानक झालेल्या या मोठ्या किंमतवाढीचे अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. टेंडर प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एवढी मोठी उडी मारण्यामागे कोणते हितसंबंध दडले आहेत, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे, तसेच, डॉ. सुनील देशमुख यांची भूमिका योग्य असली तरी, डीपी आराखडा सुरू असतांना हा मुद्दा अधिक ठामपणे मांडायला हवा होता?, विशेषतः हि जागा शहराच्या विकासासाठी राखीव राहावी यासाठी हे प्रकरण शासनाकडे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.
– प्रा. प्रदीप दंदे, माजी नगरसेवक
* मार्केट उभारलयास फायदा जनतेलाच

मोसीकॉल परिस रात ले-आऊट किंवा मार्केट उभार लयास त्याचा थेट फायदा स्थानिक नागरिकांनाच होईल. या जागेच्या चारही बाजूंना दाट वस्ती असल्याने येथे कोणतेही सार्वजनिक प्रकल्प उभारले, तरी त्याचा उपयोग जनतेलाच होणार असून मध्यवस्तीत त्यामुळे वाहतुक समस्येवर आळा बसेल, यात शंका नाही.
– कौशिक अग्रवाल,
मनपा नगरसेवक




