मित्रानेच केली मित्राची हत्या
अष्टमासिद्धी शेतशिवारातील घटना

परतवाडा/21 जानेवारी -अचलपूर : जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात असलेल्या अष्टमासिद्धी शेतशिवारात काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना उघडकीस आली आहे. केवळ स्वयंपाक चांगला झाला नाही या क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. थ्रेशर मशीनवर काम करणार्या एका मजुराने आपल्याच जिवलग मित्राच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याची हत्या केली.
दारूची नशा आणि रागाच्या भरात घडलेल्या या प्रकारामुळे संपूर्ण चिखलदरा आणि परतवाडा परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सविस्तर माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील काजलडोह येथील रहिवासी असलेले बीरू शिवकली मरसकोल्हे (वय 40) आणि भोंदू ब्रिजलाल कवडे (वय 32) हे दोघे एकमेकांचे मित्र होते. पोटाची खळगी भरण्यासाठी हे दोघेही मजूर म्हणून अष्टमा सिद्धी परिसरातील एका शेतात थ्रेशर मशीनवर कामाला होते. नेहमीप्रमाणे दिवसभर काम आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास दोघेही आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी परतले. तिथे भोंदू स्वयंपाक करत असताना बीरूने ’तुला जेवण नीट बनवता येत नाही’ असे म्हणून त्याला डिवचले. यावरून दोघांमध्ये किरकोळ शाब्दिक चकमक झाली. मात्र, काही वेळाने वाद विसरून दोघांनीही एकत्र बसून मद्यप्राशन केले. मद्याच्या नशेत असताना जेवताना पुन्हा तोच विषय निघाला आणि संतापलेल्या बीरूने जेवणाने भरलेली ताटली भोंदूच्या अंगावर फेकली. मित्राचा हा अपमान भोंदूला सहन झाला नाही. त्याने रागाच्या भरात जवळच असलेले लाकूड उचलून बीरूच्या डोक्यावर जोरात प्रहार केला. या हल्ल्यामुळे बीरूच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. रक्त पाहून भोंदू घाबरला, त्याने जखमेवर हळद भरून पट्टी बांधली आणि दोघेही तिथेच झोपून गेले. दुर्दैवाने, डोक्याला झालेली जखम गंभीर असल्याने बीरूचा झोपेतच मृत्यू झाला. सकाळी उठल्यावर बीरू हालचाल करत नसल्याचे पाहून भोंदूला आपली चूक उमजली. भीतीपोटी त्याने स्वतःच पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. परतवाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे.
हळद लावून वाचवण्याचा अयशस्वी प्रयत्न-रागाच्या भरात आपल्याच मित्रावर हल्ला केल्यानंतर, बीरूच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे पाहून आरोपी भोंदूचे मन हेलावले होते. त्याने ग्रामीण उपचाराचा भाग म्हणून जखमेवर हळद दाबून धरली आणि कापडाने पट्टी बांधली. मात्र, अंतर्गत रक्तस्राव जास्त झाल्याने बीरूचा जीव वाचू शकला नाही. रागाचा एक क्षण आयुष्यभराचा पश्चात्ताप देऊन गेला, अशी चर्चा परिसरात आहे.




