अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा मृत्यू

मोर्शी /8 जून: अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेलेल्या एका(16)वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दि.8 जून रोजी दु.3 वाजता उघडकीस आली. मृतक तरुणाचे नाव अल्फेज काजी, जाकीर काजी वय (16) वर्ष रा. शहापूर तालुका वरुड ह. मु.नूर कॉलनी पाण्याच्या टाकीजवळ मोर्शी असे आहे. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अल्फेज काजी,जाकिर काजी हा सोळा वर्षीय तरुण आपले मामा रिजवान खान नूर कॉलनी यांचेकडे मिस्त्री काम शिकण्यासाठी मोर्शी येथे आला होता.आज दि.8 जून रोजी दु.2 वाजता अल्फेज खान सोबत नूर कॉलनी येथील आठ ते नऊ तरुण अप्पर वर्धा धरणाच्या जलाशयात पोहण्यासाठी गेले होते. अल्फेज हा समोर जाऊन पाण्यात पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडत असल्याचे पाहून बाकी तरुणांनी आरडाओरड केली. दरम्यान या घटनेची माहिती त्वरित मोर्शी पोलिसांना दूरध्वनीद्वारे देण्यात आली लगेच मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्कॉड विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरकुल व त्यांची अधिनस्त टीम घटनास्थळी पोहोचली. लगेच त्यांनी या ठिकाणी हिवरखेड येथील मासेमारी करणार्यांना पाचारण केले.तथापि मोर्शी येथील आपदाग्रस्त टीम सुद्धा घटनास्थळी दाखल झाली.त्यांनी जलाशयात संयुक्तरित्या तपास सुरू करून अल्फेज याचे प्रेत सायंकाळी 6 वाजता पाण्याबाहेर काढण्यात त्यांना यश प्राप्त झाले. मृतकाचे प्रेत शवच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.मृतकावर शहापूर पुनर्वसन वरुड तालुका येथे अंतिम संस्कार पार पडणार आहे.यावेळी मोर्शी येथील आपदाग्रस्त टीमचे सागर तायडे, प्रियांशु तायवाडे, विवेक सावरकर,राज कुरवाडे, सतीश खंडारे तसेच नईमखान,अजिज पठाण,निसार पठाण, शेरखान,रिजवान खान, सय्यद अहेफाज, अश्फाक अहमद, आप्पासाहेब गेडाम यांनी सुद्धा घटनास्थळी जाऊन सहकार्य केले. पुढील तपास मोर्शीचे ठाणेदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल बुरुकुल,पो.कॉ. स्वप्निल बायस्कर, छत्रपती करपते,श्याम चुंगडा,गोपाल घाटे, रविकांत जामनेकर करीत आहे.