नगराध्यक्षपदाकरीता वरुडमध्ये 9 तर शें.घाटमध्ये 6 उमेदवार रिंगणात
नगरसेवक पदाकरीता वरुडात 117 तर शेंदुरजनाघाटमध्ये 82 उमेदवार लढतीत

वरुड । 21 नोव्हेंबर – शेंदुरजनाघाट आणि वरुड नगरपरिषदेच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाची निवडणुकीकरीता आज नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी येत्या 2 डिसेंबरला होऊ घातली असून आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसर्या दिवशी वरुड नगरपालिकेत नगरसेवकपदासाठी अवघ्या 5 उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली त्यामुळे आता 26 नगरसेवकांच्या निवडीकरीता आता एकूण 117 उमेदवार रिंगणात उरले आहेत तर शेंदुरजनाघाट नगरपालिकेमध्ये 6 नामांकन परत घेण्यात आले त्यामुळे 20 नगरसेवकांच्या निवडीकरीता आता एकूण 82 उमेदवार रिंगणात उरले आहेत. वरुडमध्ये नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दोघांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रिंगणात आता 9 उमेदवार उरले आहेत तर शेंदुरजनाघाटमध्ये मात्र कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्या ठिकाणी एकूण 6 उमेदवार निवडणुक रिंगणात उरले आहेत. वरुड नगरपरिषदेमध्ये 26 नगरसेवकांच्या निवडीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसपर्यंत शेकडो उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते. गेल्या 2 दिवसांपासुन उमेदवारी अर्ज मागे घेण्याकरीता कोणीही पुढे येत नसतांना आज मात्र माजी नगरसेवक तथा अपक्ष उमेदवार तुषार मारोतराव धुर्वे व अपक्ष उमेदवार निलेश सुभाषराव सिरसाम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. नगरसेवक पदाकरीता प्रभाग क्र.3 ब चे अपक्ष उमेदवार प्रविण पांडुरंग रडके, प्रभाग क्र.4 अ चे अपक्ष उमेदवार राजेश अशोकराव मदने, प्रभाग क्र.5 ब चे अपक्ष उमेदवार इकराम शाह रज्जाक शाह व राजु अण्णाजी बांबल, प्रभाग क्र.11 ब चे अपक्ष उमेदवार खान सईद इबिबुरहेमान खान यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता 26 नगरसेवक निवडीकरीता 117 उमेदवार निवडणुक रिंगणात उरले आहेत. शेंदुरजनाघाट नगरपरिषदेमध्ये 20 नगरसेवकांच्या निवडीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसपर्यंत अनेकांनी उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्षपदाकरीता कोणीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने नगराध्यक्षपदाकरीता निवडणुक रिंगणात 6 उमेदवार उरले आहेत तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीकरीता प्रभाग क्र.1 ब चे अपक्ष उमेदवार ओम चंद्रशेखर चिमोटे, प्रभाग क्र.3 ब चे अपक्ष उमेदवार शेख आशिक शेख वजीर, प्रभाग क्र.7 ब चे अपक्ष उमेदवार तथा भाजपा माजी शहराध्यक्ष निलेश अण्णाभाऊ फुटाणे, प्रभाग क्र.7 ब चे अपक्ष उमेदवार सुनिता किरणराव सावरकर, प्रभाग क्र.9 ब चे अपक्ष उमेदवार मिथिलेश विलासराव खसारे, प्रभाग क्र.9 ब चे अपक्ष उमेदवार अंकुश अरविंदराव मोघे यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले, त्यामुळे आता 20 नगरसेवक निवडीकरीता 82 उमेदवार निवडणुक रिंगणात उरले आहेत. शेंदुरजनाघाट नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाकरीता भाजपाच्या वतीने सुवर्णा हरिभाऊ वरखडे, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मीना श्रीराम कोकोडे, शिवसेना उभाठा तर्फे प्रांजली कपिल तरार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे वतीने शुभांगी संतोष धुर्वे, अपक्ष माला अजय कंगाले आणि करिष्मा शिकल धुर्वे हे रिंगणात आहेत तर वरुड नगरपरिषदेत नगराध्यक्षपदाकरीता अपक्ष धर्मेंद्र मनीराम उईके, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सुनील किसनाजी तुमराम, महाविकास आघाडीचे वतीने प्रशांत प्रल्हादराव धुर्वे, अशोक पुनाजी पंधरे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वतीने चेतना राहुल बेलसरे, अपक्ष सुनील नत्थुजी वटके, अपक्ष सीमा अनिलराव सयाम, भाजपाच्या वतीने ईश्वर शिवकुमार सलामे, अपक्ष दिपांशु दीपक सलामे हे निवडणुक रिंगणात उरले आहेत. दोन्ही नगरपरिषदांमध्ये भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. वरुड नगरपरिषद निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार तर सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन वरुडचे मुख्याधिकारी गजानन भोयर, अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार नामदेव गडलिंग काम पाहात आहेत तर शेंदुरजनाघाट नगरपरिषद निवडणुकीत निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसिलदार रामदास शेळके तर अतिरिक्त सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन नायब तहसिलदार पंकज चव्हाण व शेंदुरजनाघाटचे मुख्याधिकारी विक्रम शिरके काम पाहात आहेत.




