79 उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात

अमरावती /21 जानेवारी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती कार्यालयाच्या आवारात ’पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्या’चे (प्लेसमेंट ड्राईव्ह) आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास जिल्ह्यातील उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रोजगार मेळाव्यात एकूण 100 रिक्त पदांसाठी ऑनलाईन, ऑफलाईन 274 उमेदवारांनी सहभाग नोंदवून त्यापैकी 249 उमेदवारांनी प्रत्यक्ष येऊन मुलाखती दिल्या व मुलाखती दिलेल्या उमेदवारापैकी 79 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. या मेळाव्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, अभिषेक ठाकरे उपस्थित होते. या मेळाव्यात नामांकित खासगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. यामध्ये जाधव गियर लि. चे विलास नाईक, प्लास्टी सर्ज प्रा. लि. चे संचालक श्री. डागा व श्रीमती पद्मिनी साहू, स्पंदन फायनान्सच्या केयुरी देशमुख, सनलाईट सोलरचे अक्षय वाळके, श्रीराम फायनान्सचे अजय बोंडे, विविक्सा प्रा. लि. चे उज्ज्वल बंग, रेडियंट सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. श्रीमती अग्रवाल आणि सहयोग मल्टी बँकचे श्री. गुप्ता या उद्योजकांनी उपस्थित राहून निवड प्रक्रिया पार पाडली. तसेच त्यांनी उपस्थित उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन विविध पदांवर प्राथामिक निवड केली. कार्यक्रमाचे संचालन आकाश येवले यांनी तर आभार कृपा अर्गुलेवर यांनी मानले.




