72 ग्रॅम सोने व 1 लाख रुपये उडविले
बांधकाम कंत्राटदाराच्या घरावर अज्ञात चोरट्यांचा निशाणा

अमरावती /22 सप्टेंबर : बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बडनेरा जुनी वस्ती–संभाजी नगर (माता फैल) येथील रहिवासी आशिष प्रभाकरराव पंडितकर (35) यांच्या बंद घराला अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य केले. कपाटातून 72 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 1 लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. तक्रार मिळताच बडनेरा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. तक्रारीनुसार आशिष पंडितकर हे 20 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता घराला कुलूप लावून रुग्णालयात दाखल असलेल्या त्यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते. 21 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता ते घरी परतले तेव्हा मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. आशिष पंडितकर यांनी घरात जाऊन तपासणी केली असता घरात ठेवलेले सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत दिसले आणि लोखंडी कपाट तसेच सुटकेसमध्ये ठेवलेले 72 ग्रॅम सोन्याचे दागिने व एक लाख रुपये गायब झाल्याचे आढळले. आशिष पंडितकर यांनी तात्काळ बडनेरा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या आधारे बडनेरा पोलिसांनी भादंवीच्या कलम 305(अ) आणि 331(4) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.




