माजी नगरसेवकांपैकी 7 पुन्हा अजमावित आहेत नशीब
पक्षाने उमेदवारी नाकारल्याने काही बाहेर तर काहींनी आप्तेष्टांना बनविले उमेदवार

वरुड । 25 नोव्हेंबर – येथुन जवळच असलेल्या शेंदूरजनाघाट नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व 20 नगरसेवक निवडीकरीता येत्या 2 डिसेंबर रोजी निवडणुक होऊ घातली असून भारतीय जनता पार्टी सह विविध पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. शेंदूरजनाघाट नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारीवरुन झालेले रणकंदन सर्वश्रृत असतांना या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारांना मतदार स्विकारतात की इतर उमेदवारांना? हे येत्या 3 डिसेंबर रोजी कळणार आहे. या निवडणुकी करीता विद्यमान आमदार उमेश उर्फ चंदू यावलकर व माजी आमदार देवेंद्र भुयार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 20 नगरसेवक पदांकरीता तब्बल 70 उमेदवार नगराध्यक्ष पदाकरीता 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. विद्यमान 17 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवकांनी पुन्हा निवडणुकीत आपले नशीब जवान अजमाविण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित 10 नगरसेवक मात्र विविध कारणांमुळे निवडणुक रिंगणाच्या बाहेर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या निवडणुकीत प्रभाग क्र.1 मधून भारतीय जनता पार्टीचे विशाल प्रल्हाद सावरकर व निलिमा ओमप्रकाश कांडलकर, प्रभाग क्र.2 मधून धनराज गोविंदराव अकर्ते व रेखा राजेंद्र अढावु, प्रभाग क्र.3 मधून भारतीय जनता पार्टीच्या जया नितीन श्रीराव व अनिस शेरखान यांनी विजय संपादन केला होता. प्रभाग क्र.4 मधून राष्ट्रीय काँग्रेसचे राकेश माधवराव दवंडे व भारतीय जनता पार्टीच्या राजश्री अरुण डोईजोड, प्रभाग क्र.5 मधून भारतीय जनता पार्टीच्या मंदा सुरेश वसुले व सतीश केशवराव अकर्ते, प्रभाग क्र.6 मधून भारतीय जनता पार्टीचे मंगलु पंधराम व मोनिका दिनेश भोंगाडे, प्रभाग क्र.7 मधून सारिका जगदीश बेलसरे व सुभाष महादेव गोरडे तर प्रभाग क्र.8 मधून भारतीय जनता पार्टीच्या सुनीता जीवन वंजारी व शिवसेनेचे भूपेंद्र तुकाराम कुवारे यांनी विजय संपादन केला होता.दरम्यान विद्यमान 17 नगरसेवकांपैकी शिवसेनेचे भुपेंद्र कुवारे हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्र.5 मधून, विशाल प्रल्हादराव सावरकर प्रभाग क्र.1 मधून अपक्ष, रेखा राजेंद्र अढावु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने प्रभाग क्र.2 मधून, धनराज गोविंद अकर्ते प्रभाग क्र.2 मधून अपक्ष, जया नितीन श्रीराव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने प्रभाग क्र.3 मधून, राकेश मधुकरराव दवंडे प्रभाग क्र.10 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने तर सुनीता जीवन वंजारी या प्रभाग क्र.10 मधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरले आहेत. माजी नगराध्यक्ष रुपेश ताराचंद मांडवे यांना भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्र.10 मधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे गेल्या पंचवार्षिक मध्ये नगरसेवकपदी विराजमान असलेल्या 17 नगरसेवकांपैकी 10 नगरसेवकांना विविध कारणांमुळे यावेळी मैदान सोडावे लागले तर केवळ 7 नगरसेवकहे पुन्हा मैदानात उतरले असून आपले नशीब आजमावत आहेत. त्यामुळे येत्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत अनेक ठिकाणी अत्यंत चुरशीची लढत दिसून येत आहे.




