अप्पर वर्धाचे 7 दरवाजे उघडे – निसर्गाचा थरारक सोहळा
परिसरात पाण्याचा गडगडाट आणि उंच उसळणारे तुषार

-337 घनमीटर प्रति सेकंदाने विसर्ग
-नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
-जलसाठा 91 टक्क्यांवर पोहोचला
मोर्शी / 28 ऑगस्ट : अप्पर वर्धा धरण परिसरात गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला. मध्यप्रदेशातून येणार्या जामनदी व माडु नद्या तुडुंब वाहू लागल्या आहेत. त्यासोबतच जलालखेडा परिसरातून वर्धा नदीला आलेल्या महापुरामुळे धरणाचा जलसाठा झपाट्याने वाढला. यामुळे आज गुरुवारी, 28 ऑगस्ट रोजी धरणाचे 13 पैकी 7 दरवाजे 30 सेंटीमीटरने उघडण्यात आले. या दरवाज्यांतून 337.47 घनमीटर प्रति सेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला.
प्रकल्पाची सात दारे उघडताच अप्पर वर्धा धरण परिसरात आज निसर्गाचा थरारक सोहळा अनुभवायला मिळाला. पाण्याचा प्रचंड गडगडाट, उंच उसळणारे तुषार आणि सर्वत्र घुमणारा आवाज यामुळे परिसर भारून गेला. धरणाच्या पायथ्याशी जणू एखादा महाकाय धबधबा कोसळत असल्याचे विलोभनिय व थरारक दृष्य निर्माण झाले आहे. हा अद्भुत देखावा पाहण्यासाठी लोकांची लवकरच येथे गर्दी उसळण्याची शक्यता आहे. दरवर्षी हजारो डोळे या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात.
आज धरणक्षेत्रात सर्वप्रथम पाण्याची विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. कार्यकारी अभियंता अनिकेत सावंत, सहाय्यक अभियंता मनाली नंदागवळी आणि शाखा अभियंता शुभम जयस्वाल यांच्या उपस्थितीत गेट उघडण्यात आली. दुपारी 1 वाजता धरणाची पाण्याची पातळी 341.98 मीटर नोंदली गेली असून, ती निर्धारित पातळी 342.50 मीटर इतकी आहे. म्हणजेच धरण 91.75 टक्के भरलेलं आहे. धरणाचा विसर्ग सुरू होताच 27 ऑगस्ट रोजीच नदीकाठच्या गावांतील ग्रामस्थ व मासेमार्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता. नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता अद्याप कायम आहे.
धरणाची गेट उघडताच परिसरात जणू पाण्याचा उत्सवच सुरू झाला. जोरात वाहणारे पाणी, उंच उसळणारे तुषार आणि गडगडाटी आवाजाने वातावरण भारून गेले. दरवर्षी पर्यटक या क्षणाची आतुरतेने वाट पाहतात. गेल्या वर्षी या ठिकाणी झालेल्या आकर्षक रोशनाईने धरण परिसर पर्यटनस्थळासारखा उजळून गेला होता. यंदाही तोच उत्साह जाणवतो आहे. गेल्या वर्षी दि. 5 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा गेट उघडले गेले होते. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी तब्बल 11 गेट उघडावी लागली होती. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने गेट उघडण्यात थोडा विलंब झाला.
-परिसर पर्यटन स्थळात परिवर्तित
गेटमधून बाहेर पडणार्या पाण्याचे धबधब्यासारखे दृश्य, अंगावर झेलले जाणारे तुषार, हा थरारक अनुभव असतो. प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यानंतर या परिसरात निसर्गाचा अद्भूत नजारा पाहायला मिळत आहे. धरण परिसर निसर्गरम्य पर्यटनस्थळात परिवर्तित झाले आहे. दरवर्षी हजारो लोक हे दृष्य डोळ्यात साठवून घेण्यासाठी गर्दी करतात. यंदाही येथे पर्यटकांचा मेळावा लागणार आहे.




