56 वर्षीय अंध जैन साध्वीचा जळून मृत्यु
गाणुवाडी परिसरातील घटना

अमरावती / 20 जून: दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 56 वर्षीय जैन साध्वीचा जळून मृत्यु झाल्याची घटना जून्या बायपास मार्गावरील गाणूवाडी परिसरात असलेल्या एमआर कॉलनीत पहाटे घडली. माधुरी लक्ष्मणराव धोपाटे असे मृतक महिलेचे नाव आहे. धोपाटे या कशामुळे जळल्या हे समजू शकले नाही. पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
याबाबत राजेंद्र किशोर बंड (65) यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार मृतक माधुरी धोपाटे या बंड यांच्या लहान साळी होत्या. बंड यांच्या घराशेजारीच एका घरात वरच्या माळावरील खोलीत माधुरी वास्तव्यास होत्या. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या माधुरी यांनी लहानपणीच जैन साध्वीपदाची दिक्षा घेतली होती. माधुरी यांच्या खाण्यापीण्याची व्यवस्था करणे आणि सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांची त्यांची मोठी बहिण अरुणा गिरे या पाहत होत्या. त्यांनाच माधुरी यांच्या खोलीत जाण्याची परवानगी होती. माधुरी या पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत देवाची उपासना करायच्या आणि दैनंदिन काम करुन खोलीतच आराम करायच्या. गेल्या 10 वर्षांपासून त्यांचे मानसिक स्वास्थ्य ठिक नव्हते. त्या चिडचिड व स्वत:शीच बडबड करायच्या असे बंड यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान गुरुवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास माधुरी धोपाटे यांच्या खोलीतून मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकु आला. तेव्हा बंड यांच्यासह कुटुंबिय आणि शेजार्यांनी खोलीकडे धाव घेतली मात्र खोलीच समोरचा दरवाजा बंद होता. त्यामुळे सर्वजण मागील दाराने खोलीत शिरले तेव्हा माधुरी या जळत असल्याचे दिसून आले. त्यांच्या अंगावर पाणी टाकून आणि ब्लँकेट गुंडाळून तात्काळ आग विझविण्यात आली आणि त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुटुंबियांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. मात्र माधुरी या कशाने जळाल्या, हे समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मित मृत्युची नोंद करुन तपास सुरु केला आहे.




