पोटे पाटील अभियांत्रिकीच्या 51 विद्यार्थ्यांची ‘सेडेमॅक मेकाट्रॉनिक्स’ मध्ये निवड
महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमरावती /17 मार्च : स्थानिक पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयातील 51 विद्यार्थ्यांनी आपल्या तांत्रिक कौशल्याच्या जोरावर नामांकित ’सेडमॅक मेकाट्रॉनिक्स लिमिटेड’ या कंपनीत स्थान मिळवले आहे. महाविद्यालयात आयोजित विशेष निवड प्रक्रियेतून (कॅम्पस प्लेसमेंट) या विद्यार्थ्यांची निवड झाली असून, त्यांनी यशाची मोठी भरारी घेतली आहे. ही कंपनी प्रामुख्याने दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी लागणारे प्रगत नियंत्रण घटक आणि इंधन पुरवठा यंत्रणा विकसित करणारी अग्रगण्य संस्था आहे. या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. अमरावतीच्या या मातीतील तांत्रिक बुद्धिमत्तेचा डंका आता औद्योगिक क्षेत्रात घुमणार आहे. अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षात शिकणार्या या 51 विद्यार्थ्यांनी खडतर निवड प्रक्रियेतून आपली गुणवत्ता सिद्ध केली. यामध्ये विद्युत अभियांत्रिकी विभागातील 31 आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागातील 20 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सेडमॅक ही कंपनी स्वयंचलित वाहन क्षेत्रात संशोधनासाठी ओळखली जाते, अशा प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणे ही विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची नांदीच आहे. याप्रसंगी संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन्स विभागाच्या प्रमुख प्रा. मोनिका जैन, प्रशिक्षण व निवड अधिकारी प्रा. प्रतीक भट्टड, इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार विभागप्रमुख डॉ. उमेश होरे, विद्युत विभागप्रमुख डॉ. संजय बी. वरकड तसेच प्रा. अनिकेत पावड आणि प्रा. सचिन जळीत यांनी उपस्थित राहून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




