व्यापार्‍याच्या घरातून 5 तोळे सोने, 5 लाख रोख लंपास

चांदुर बाजारात चोरट्यांचा हैदोस

-36 तासांत तिसरी चोरी; पोलिसांसमोर मोठे आव्हान
चांदूरबाजार / 25 ऑगस्ट : चांदूरबाजार शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांडला असून शनिवारी राष्ट्रीय महामार्ग 353-जेलगत सिरजगाव बंड-जमापुर येथील रहिवासी वस्तीत भरदिवसा झालेल्या मोठ्या चोरीने परिसर हादरला आहे. ताज मोहम्मद अब्दुल रऊफ या फर्निचर व्यापार्‍याच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच तोळे सोन्याचे दागिने व पाच लाख रुपये रोख रक्कम चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे, केवळ 36 तासांच्या अवधीत ही तिसरी मोठी चोरी असून पोलिसांसमोर गुन्हेगारांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी साधारण 1.30 वाजता घरातील महिला बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. जवळपास दीड तासानंतर 2.45 वाजता घरी परतल्यावर मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसून आले. घरात शिरल्यावर बेडरूमसह इतर खोल्यांतील आलमारीचे कुलूप फोडून सर्व साहित्य अस्ताव्यस्त आढळले. घाबरलेल्या महिलांनी तत्काळ व्यापारी ताज मोहम्मद यांना तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, ताज मोहम्मद यांच्या मुलीच्या विवाहासाठी त्यांनी खास दागिने व रोकड जमा करून ठेवली होती. मात्र ही सर्व रक्कम व सोन्याचे दागिने लंपास झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार अशोक जाधव, एपीआय उल्हास राठोड यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. फॉरेन्सिक टीमनेही तपास करून महत्त्वाचे पुरावे जमा केले. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, मागील 36 तासांत शहरात सलग तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. यापूर्वी मोर्शी रोडवरील रेडियम शॉपमधून इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरी झाले, त्यानंतर वलगाव रोडवरील पानटपरी चोरट्यांनी फोडली आणि आता ही भरदिवसाची मोठी घरफोडी पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button