अचलपूरमध्ये बनावट बँकेच्या नावाखाली 40 लाखांची फसवणूक
7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अचलपूर / 3 ऑगस्ट : अचलपूर शहरात ’अर्बन को-ऑपरेटिव्ह निधी लिमिटेड’ या नावाने सुरू करण्यात आलेल्या बनावट बँकेच्या माध्यमातून तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अचलपूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रंजना वसंतराव बुरंगे (वय 51, रा. परतवाडा) या अर्बन को-ऑपरेटिव्ह निधी लिमिटेड बँकेत क्रेडिट मॅनेजर म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी 3 ऑगस्ट रोजी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बनावट बँक स्थापन करून नागरिकांना आकर्षक व्याजदरांचे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात रक्कम जमा करून घेतली आणि त्यानंतर बँक बंद करून फरार झाले. याप्रकरणात युवराज भगवान गिरे (अमरावती), आकाश प्रमोद बोबडे (आसेगाव पूर्णा), निकिता युवराज गिरे (अमरावती), प्रीतम जनार्दन पडोळे (लाकडी, ता. मोर्शी), दीपक बाबाराव इंगोले (जुनी वस्ती, बडनेरा), तानाजी शरदराव ठोसर, आकाश राऊत (दर्यापूर) यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी युवराज गिरे आणि त्याची पत्नी निकिता गिरे यांनी बँकेचे संचालक आणि रिजनल मॅनेजर असल्याचे भासवत बँकेत खाते उघडण्यास लोकांना प्रवृत्त केले. बँकेत डेली डिपॉझिट, सेव्हिंग, आरडी आणि फिक्स डिपॉझिटसारख्या योजनांअंतर्गत खाती उघडण्यात आली. या बँकेत 266 खातेदारांचे पैसे जमा होते, मात्र अचानक बँक बंद करून आरोपी फरार झाले. नागरिकांनी गुंतवलेले पैसे परत मिळाले नसल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ आली आहे.
अचलपूर पोलीसांनी खझउ कलम 420 (फसवणूक), 406 (विश्वासघात), आणि 34 (सामुहिक हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या प्रकरणानंतर अचलपूर पोलिसांनी नागरिकांना बँक किंवा गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करताना अधिकृत नोंदणी, परवाने व कायदेशीर कागदपत्रांची खातरजमा करण्याचे आवाहन केले आहे.




