टाकरखेडा संभू येथील 350 वर्षे पुरातन सती रेणुका माता मंदिर
नवरात्र उत्सवाला प्रारंभ

टाकरखेडा संभु/23 सटेंबर : पुरातन काळातील म्हणजे 300 ते 350 वर्षांपूर्वी भातकुली तालुक्यातील टाकरखेडा संभु येथे सती रेणुका मातेची स्थापना करण्यात आली होती. हे जागृत देवस्थान असून ही देवी पंचक्रोशीतील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे. नवरात्रोत्सवानिमित्त येथे देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते. यंदा देखील नवरात्री उत्सवादरम्यान येथे भक्तांची मांदियाळी राहणार आहे. येथील वयोवृद्ध लोकांच्या सांगण्याप्रमाणे रेणुका माता ही एक गोसावी मातेपोटी जन्माला आली आहे. या देवीच्या दैवी शक्तीचा गावातील अनेक लोकांना अनुभव आल्याचे बोलले जाते. देवीला कोणीतरी एक गाय दान दिली होती. काही दिवसांनी त्या गाईने एक गोरा जन्माला घातला. ती गाय मोकाट होती. तिला कोणीही चारा-पाणी द्यायचे. तिच्या उत्पन्नावर या मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. कालांतराने यावळे या घराण्यात काही चमत्कार घडला. देवीची कृपा झाली. या श्रद्धेमुळे त्यांनी दोन एकर शेत मंदिराला दान दिले. त्यानंतर या मंदिराची पंच कमेटीसुद्धा तयार करण्यात आली आहे. या कमेटीद्वारे आता मंदिराचा कारभार बघितला जातो. प्रभाकर बापू देशमुख हे मंदिराचे अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये मंदिराचे बांधकाम सुरू झाले. त्यानंतर गजानन बोबडे, दिलीप महादेव वानखडे यांनी देखील अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. सध्या या मंदिराचा कारभार मंदिराचे सचिव दिलीप वानखडे सांभाळत आहेत.
या रेणुका मातेची अनेकांना प्रचिती असल्याचे सांगितले जाते. महादेव बोबडे यांच्या घरातील सदस्याची प्रकृती चिंताजनक होती. त्यांनी रेणुका मातेच्या नावाचा अंगारा रुग्णाला लावला. नंतर अवघ्या पाच तासांत त्यांची प्रकृती बरी झाली. दवाखान्यात जावे लागले नाही, असे बोबडे कुटुंबियांचे म्हणणे आहे. भाऊराव अडीवकर यांच्या स्वप्नात येऊन देवीने त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला, असे अडीवकर यांनी सांगितले. असे अनेक चमत्कार येथे घडल्याचे वृद्ध नागरिक सांगतात. नवरात्रोत्सवानिमित्त येथे सात दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो. विविध कार्यक्रम होतात. गावातून भव्य शोभायात्रा निघते. येथे 54 वर्षांपासून पुंडलीक महाराज जयंती सुद्धा साजरी केली जाते. शिवराव देशमुख, कृष्णराव चितोडे, काशिराव, सुधाकरराव सातनुरकर, नारायणराव अडीवकर या सर्व लोकांनी येथे पुंडलीक महाराज जयंतीचा हा कार्यक्रम सुरू केला. सात दिवस धार्मिक कार्यक्रम होतात. गावातून श्री पुंडलीक महाराजांची शोभायात्रा काढली जाते. नंतर गाव पंगत होते. संपूर्ण गाव या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन हातभार लावते. येथे नवरात्रात नऊ दिवस फार आनंदात जातात. नवरात्रीमध्येही मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते. तर रोज पहाटे 4 वाजता रेणुका माता मूर्तीचा दही-दूधाने अभिषेक केला जातो. टाकरखेडा संभु गावातील रेणुका माता हे जागृत देवस्थान असल्याची दृढ श्रद्धा आहे. आज सोमवारपासून येथे उत्सवाला सुरुवात होत आहे.




