धारणीत 35 किलो गौमांस जप्त

कुरैशी मोहल्ल्यात पोलिसांचा छापा

-आरापीवर गुन्हा दाखल
धारणी / 17 सप्टेंबर : धारणी शहरातील मांडवा रोडवरील कुरैशी मोहल्ल्यात पोलिसांनी गुप्त माहितीनंतर केलेल्या कारवाईत तब्बल 35 किलो गौमांस जप्त करण्यात आले. हे गौमांस विक्रीसाठी आणण्यात आले होते. या प्रकरणी आरोपी शेख नासीर शेख गफूर (वय 40, राहणार कुरैशी मोहल्ला) याच्याविरोधात धारणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण आणि गौवंश हत्या प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धारणी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, कुरैशी मोहल्ल्यात राहणारा शेख नासीर शेख गफूर आपल्या परिसरात बेकायदेशीररीत्या गौवंशाची कत्तल करून त्याचे मांस विक्रीसाठी ठेवतो. त्यानुसार पोलिसांनी तत्काळ कारवाई करत छापा घातला. या छाप्यात 35 किलो गौमांस जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे 5 हजार 250 रुपये एवढी होते. याशिवाय इतर साहित्य धरून एकूण 5 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणात धारणी पोलिसांनी शेख नासीर याच्याविरुद्ध बीएनएस कलम 325 सह गौवंश हत्या प्रतिबंधक अधिनियमातील कलम 5, 5(अ)(2), 5(ब), 5(क)(5), 9(अ) आणि 11 अंतर्गत गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे. ही कारवाई धारणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अवतारसिंह चौहाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. पाठक, पो.हे.का. प्रेमानंद गुडधे व पो.कॉ. सुमीत घोटेकर यांच्या पथकाने केली.

संबंधित बातम्या

Back to top button