भानखेडा येथे 3.62 लाखांची घरफोडी
रोख रकमेसह सोन्याचे दागीणे लंपास

अमरावती / 2 जुलै: घराच्या दाराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागीणे असा 3 लाख 62 हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भानखेडा खुर्द या गावात घडली. याबाबत संजय अंबादास शिंदे (35) याने तक्रार दाखल केली आहे.
संजय शिंदेच्या तक्रारीनुसार त्याने पंधरा दिवसांपूर्वी आपल्या साळ्याकून दोन लाख रुपये उसणे घेतले होते. ही रोख रक्कम आणि पत्नीचे सोन्याचे दागीणे त्याने घरातील कपाटात ठेवले होते. त्यानंतर संजय शिंदे हा घराला कुलुप लावून आपल्या कुटुंबियांसह कामानिमित्त मध्यप्रदेशातील बैतुल येथे निघून गेला. दरम्यान मंगळवारी, 1 जुलै रोजी सकाळी 8 वाजता संजयचा चलत भाउ राहुल शिंदे याने संजयला फोन केला. तुझ्या घराचे कुलुप तुटलेले असून घरात चोरी झाली असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा संजय आणि कुटुंबिय तात्काळ गावी येण्यासाठी निघाले.
घरी येउन संजय आणि त्याच्या पत्नीने बघितले असता कपाटातील 2 लाख रुपये रोख आणि 1 लाख 62 हजार रुपये किंमतीचे 44 ग्राम वजनाचे सोन्याचे दागीणे गायब असल्याचे दिसून आले. संजय शिंदेने याबाबत लगेच बडनेरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन तपासाला सुरुवात केली आहे. याप्रकरणात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




