जुळ्या शहरातील 29 मतदान केंद्रे संवेदनशील
अचलपूर-परतवाड्यात सुरक्षेची कडक तयारी सुरू

परतवाडा /28 नोव्हेंबर : अचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरातील नगरपरिषद निवडणुकीच्या तयारीत प्रशासनाने मोठे पाऊल उचलत 112 मतदान केंद्रांपैकी 29 केंद्रे ‘संवेदनशील’ म्हणून घोषित केली आहेत. शहराच्या पूर्वीच्या इतिहासाचा विचार करता या केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षेची गरज असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले आहे.
अचलपूर-परतवाडा परि सराला पूर्वीपासूनच संवेदनशीलतेची छटा लाभली आहे. गेल्या काही दशकांत जातीय तणाव, वाद-विवाद आणि अचानक उद्भवलेल्या घटनांमुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेला अनेकदा ताण निर्माण झाला होता. काही प्रसंगी परिस्थिती बिघडून दंगलीपर्यंत पोहोचल्याने व्यापार, वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे नागरिकांच्या मनात निवडणूक काळाबद्दल सतत सावधतेची भावना असते.
यंदाच्या निवडणुकीत परिस्थिती सुरळीत राहावी म्हणून पोलीस यंत्रणेने संवेदनशील केंद्रांसाठी स्वतंत्र नियोजन तयार केले आहे. या ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करणे, तात्काळ प्रतिसाद पथक सज्ज ठेवणे, सीसीटीव्ही नियंत्रण वाढवणे, रात्रगस्त आणि पादचारी गस्त वाढवणे अशा उपाययोजना करण्याची आखणी सुरू आहे. संवेदनशील केंद्रांवरील जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील संवाद उपक्रमांनाही चालना दिली जात आहे. व्यापारी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाला काही सूचना दिल्या आहेत. विशेषतः बाजारपेठ, वर्दळीचे रस्ते आणि गर्दीची ठिकाणे येथे अतिरिक्त प्रकाशयोजना, वाहतूक नियंत्रण आणि पोलीस उपस्थिती वाढविण्याची मागणी होत आहे. नागरिकांमध्ये शांततेचे आवाहन करण्यासाठी काही संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. हातात मतदानाचा दिवस जवळ आला असताना सर्वांच्या नजरा प्रशासनावर आहेत. योग्य नियोजन आणि काटेकोर सुरक्षा असेल तर शहरात कोणताही तणाव न होता निवडणूक पार पडेल, असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे. अचलपूर-परतवाडा परिसरात या वेळी अधिक जबाबदारीने, शांततेत आणि पारदर्शक वातावरणात मतदान व्हावे, या उद्देशाने प्रशासन आणि पोलीस विभाग एकत्रितपणे तयारीत असून, जुळ्या शहरातील निवडणुकीचे वातावरण हळूहळू अधिक सुरक्षित दिशेकडे जात असल्याचे चित्र दिसत आहे.




