अतीव्यस्त रस्त्यावर 200 खड्डे, प्रहारचा आक्रमक पवित्रा

दीड फूट खोल खड्ड्यात लावले बेशरमचे रोप

-प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न
अमरावती / 28 जुलै : शहरातील मध्यवर्ती आणि अतिव्यस्त रस्ते 200 पेक्षा अधिक खड्ड्यांनी पोखरले गेले असताना, प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पंचवटी चौक ते कोषागार मार्ग, राजकमल, बडनेरा रोड या प्रमुख मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नागरिकांना रोजच्या प्रवासात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, अनेक अपघातांची मालिका सुरू आहे. या गंभीर प्रश्नाला वाचा फोडत प्रहार जनशक्ती पक्षाने सोमवारी आक्रमक पवित्रा घेत, थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले. या आंदोलनाचं वैशिष्ट्य म्हणजे, कार्यकर्त्यांनी दीड फूट खोल खड्ड्यांत बेशरमचे रोपे लावून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा तीव्र निषेध केला.
प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी खड्ड्यांतून रोपे लावताना सवाल उपस्थित केला. रोजच्या प्रवासात खड्ड्यांमुळे वाहनचालक हैराण झाले आहेत. अनेक वृद्ध, महिला, विद्यार्थी अपघातात जखमी झाले असून, अनेकांचे वाहनांचेही नुकसान झाले आहे. या सगळ्यावर उपाययोजना करण्याऐवजी प्रशासन केवळ निव्वळ आश्वासनांवर वेळ मारून नेत असल्याचा आरोप करण्यात आला. खड्ड्यांमुळे गंभीर दुर्घटना घडली, तर जबाबदार कोण?, जर उद्या एखादी दुर्दैवी घटना घडली, तर जबाबदार कोण? प्रशासन, की गप्प बसलेले लोकप्रतिनिधी? असा जाहीर सवाल प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
प्रहार पक्षाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर तातडीने रस्त्यांची दुरुस्ती सुरू झाली नाही, तर आणखी तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल. नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळ माफ केला जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात महानगर प्रमुख बंटी रामटेके, संपर्क प्रमुख गोलू पाटील, शहर महासचिव अभिजित गोंडाणे, युवा आघाडीचे शहर प्रमुख मनीष पवार, शेषराव धुळे, विक्रम जाधव, समीप तायडे, नंदू वानखडे, अजय तायडे, आशिष हवशीकर, निरंजन ठाकरे, सार्थक याउल, रिनीत भुक्ते आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button