सुलतानपूर येथे युवकाकडून 2 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त

ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई; आरोपी अटक

अमरावती /10 नोव्हेंबर – अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सुलतानपूर गावाजवळील कारवाईत एका युवकाकडून 2 किलो 10 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 40,020 इतकी आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने जाळे रचून सुलतानपूर फाटा परिसरातून गणेश माणिकराव गणवीर (वय 35) या आरोपीला पकडले. त्याच्या ताब्यातील कॉलेज बॅगची तपासणी केली असता त्यात विक्रीसाठी नेण्यात येत असलेला गांजा आढळून आला. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी मादक पदार्थांच्या तस्करीवर नियंत्रण आणण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक किरण वानखेडे तसेच तळेगाव दशासरचे ठाणेदार किरण औटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत होते. या पथकात मूलचंद भांबुरकर, अमोल देशमुख, सुधीर बावणे, चेतन दुबे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, स्वप्नील तंवर, दिनेश कनोजीया, सचिन गायधने, रितेश गोस्वामी आणि चालक हर्षद घुसे यांचा समावेश होता. गुप्त माहितीच्या आधारे पथकाने सुलतानपूर फाटा येथे सापळा रचून आरोपीला पकडले. तपासादरम्यान आरोपीकडून छत्तीसगड आणि ओडिशा येथील प्रवास तिकिटेही मिळाली असून पुढील तपास तळेगाव दशासर पोलिसांकडे सुरू आहे.

संबंधित बातम्या

Back to top button