माडू नदीत 18 वर्षीय तरुण वाहून गेला
बचाव पथकाचे प्रयत्न निष्फळ

-मौजमजेच्या क्षणी घडला अनर्थ
मोर्शी / 14 सप्टेंबर : मोर्शी शहरातील खोलवाटपुरा येथील 18 वर्षीय तरुण कुणाल किशोर बागडे हा मध्यप्रदेशातील माडू नदीच्या पात्रात पोहताना वाहून गेल्याची धक्कादायक घटना काल 13 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. कुणाल हा बारावीचा विद्यार्थी असून तो मोर्शी व नेरपिंगळाई येथील दोन मित्रांसोबत सालबर्डीमार्गे आठनेरकडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या अमराई येथे मौजमजेसाठी गेला होता. या ठिकाणी वाहणार्या माडू नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या कुणालला जोरदार प्रवाहाने वाहून नेले.
दरम्यान, 13 सप्टेंबर रोजीच कुणाल घरून निघून गेल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती. यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर अमरावती व बैतुल येथील बचाव पथकाला घटनास्थळी बोलावण्यात आले. आज रविवारी सकाळपासून अमरावती व बैतुल येथील बचाव पथकांनी संयुक्तपणे घटनास्थळी कसून शोधमोहीम हाती घेतली. मात्र दिवसभराच्या प्रयत्नांनंतरही कुणालचा मागमूस लागला नाही. अमराई हे ठिकाण मध्यप्रदेशातील आठनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे पुढील तपासाची जबाबदारी आठनेर पोलिसांकडे सोपवण्यात आली आहे. या घटनेमुळे मोर्शी शहरात व खोलवाटपुरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुटुंबिय व नातेवाईकांच्या आशा-आकांक्षा आता बचाव पथकाच्या पुढील मोहिमेवर खिळल्या आहेत.




