पीकेव्ही कॉलनीत 17 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

-घरातच घेतला गळफास
अमरावती / 26 ऑगस्ट : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीकेवी कॉलोनीत राहणारा 17 वर्षीय विद्यार्थी ओम विश्वास शिलगरे याने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ओम शिलगरे याने यावर्षी 12 वी उत्तीर्ण करून नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. गेल्या दोन दिवसांपासून कॉलेज बंद असल्यामुळे ओम आपल्या पालकांसह त्यांच्या व्यवसायासाठी बाहेर जात होता. ओमचे पालक बिझीलँडमध्ये टेलरिंगचा व्यवसाय करतात.
25 ऑगस्ट रोजी ओमचे वडील विश्वास शिलगरे आपल्या कामावर गेले. त्यानंतर ओम व त्याची आई दुचाकीवरून कामावर जाणार होते. मात्र, त्यानंतरही ओम वेळेवर पोहोचला नाही. त्याचा वडीलांनी फोनवर संपर्क साधला असता, ओमने सांगितले की तो गाडीमध्ये पेट्रोल भरुन येईल. त्यानंतर त्याने आईला कामावर पाठवले. बराच वेळ झाल्यानंतरही ओम कारखान्यावर पोहोचला नाही, त्यामुळे त्याचे पालक चितेत पडले. काही वेळाने ते घरी पोहोचले असता, घराचा दरवाजा आतून बंद होता. धक्का देऊन दार उघडल्यावर ओम सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोराने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला.
पालकांनी तत्काळ ओमला खाली काढले. मात्र तेव्हा तो मृत स्थितीत होता. या घटनेची तात्काळ माहिती राजापेठ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ओमने आत्महत्या का केली, याबाबत निश्चित कारण समजू शकलेले नाही. मुलाच्या आत्महत्येने आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात शोककळा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button