15 वर्षीय मुलावर तिघांचा चाकूने प्राणघातक हल्ला
फ्रेजरपुरातील मध्यरात्रीची घटना

अमरावती / 11 सप्टेंबर : शहरातील फ्रेजरपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली असून, 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर तिघा अज्ञात युवकांनी चाकूने जीवघेणा हल्ला केला. प्रीत चिंचखेडे (रा. सिद्धार्थ क्रीडा मंडळ, शेंडे लाईन, फ्रेजरपुरा) असे जखमी मुलाचे नाव असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती अशी की, 9 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास प्रीत आपल्या मित्रासह प्रशांत नगर येथील चायनीज गाडीवर नाश्ता करून दुचाकीने घरी परतत होता. घराजवळील माजी नगरसेवक सुदाम बोरकर यांच्या घरासमोर तो पोहोचताच एका काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलवर तिघेजण आले. वय अंदाजे 16 ते 18 वर्षांच्या या तिघांनी चेहर्यावर दुपट्टा बांधला होता. या तिघांनी प्रीतची दुचाकी थांबवली आणि मध्ये बसलेल्या युवकाने अचानक चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला. हा वार प्रीतच्या छातीवर बसणार इतक्यात त्याने हाताने तो रोखला. त्यामुळे चाकूचा घाव थेट त्याच्या उजव्या हातावर बसला आणि दोन बोटे गंभीररीत्या जखमी होऊन तुटली. रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावर ओरडू लागला. दरम्यान, त्याचा मित्र तेथे आला आणि तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रीतची अवस्था पाहता डॉक्टरांनी तात्काळ उपचार सुरू केले आहेत. दुसरीकडे, हल्ला केलेले तिघेजण घटनास्थळावरून पळून गेले. या प्रकरणी प्रीतच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 3(5) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.




