मालवाहू ट्रकखाली 14 गायींचा मृत्यू

धारणी तहसीलच्या मध्यप्रदेश सीमेजवळ भीषण अपघात

* ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

धारणी /12 नोव्हेंबर – धारणीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मध्यप्रदेश सीमेजवळील तेल्या बाबा परिसरात सोमवारी पहाटे एक हृदयद्रावक अपघात घडला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गायींच्या कळपावर वेगाने धावणार्‍या एका मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तब्बल 14 गायी जागीच मृत्युमुखी पडल्या असून काही गायी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर परिसरात एकच हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास गायींचा कळप रस्त्याच्या कडेला विश्रांती घेत थांबला होता. त्याच वेळी जलगाव दिशेने मध्यप्रदेशकडे वेगाने येणारा मालवाहू ट्रक (क्रमांक एमपी-09/सीएफ-5873) चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेला आणि थेट गायींच्या कळपावर घसरला. धडक इतकी भीषण होती की अनेक गायींचे अंगाचे चेंदामेंदा झाले. काही गायी घटनास्थळी तडफडत होत्या. या भयावह दृश्यामुळे ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले.
अपघातानंतर ट्रक चालक वाहन जागीच सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना आणि वनविभागाला तत्काळ कळवले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून फरार चालकाचा शोध सुरू आहे. ग्रामस्थांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. या परिसरात वारंवार गुरेढोरे रस्त्यावर फिरत असतात, तसेच मालवाहू वाहनांची बेफाम गती आणि चालकांचे निष्काळजी वाहनचालन यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, दर काही महिन्यांनी अशाच प्रकारे गायी, बैल किंवा मोकाट जनावरे रस्त्यावर चिरडली जातात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. गुरांचे संरक्षण करण्यासाठी गौरक्षण केंद्र स्थापन करावे आणि महामार्गावर पोलिस गस्त वाढवावी. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत गायींची तपासणी करून पंचनामा केला. मृत गायींचे अंत्यसंस्कार पंचायत समितीच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात आले.

ग्रामस्थांची ठाम मागणी

* गावाजवळ तातडीने गौरक्षण केंद्र स्थापन करावे.
* महामार्गावर नियमित पोलिस गस्त वाढवावी.
* बेफाम गतीने वाहन चालविणार्‍यांवर कडक कारवाई करावी.
* पशुपालकांना सुरक्षित ठिकाणी जनावरे ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष ?
* जागा उपलब्ध करून द्यावी.

संबंधित बातम्या

Back to top button