मिनी ट्रकमधून 14 जनावरांची कत्तलीसाठी तस्करी!
चार जनावरांचा मृत्यू

* 8 लाखाचा मुद्देमाल जप्त
मोर्शी/13 ऑक्टोबर -एका मालवाहू मिनी ट्रकमध्ये अवैधरित्या गोवंशांना अतिशय निर्दयतेने कोंबून कत्तलीसाठी नेत असताना मोर्शी पोलिसांनी नाकाबंदी करून पाठलाग केला. मात्र ट्रक चालक आणि क्लिनर यांनी शंभर मीटर अंतरावर वाहन रस्त्यावर उभे ठेवून घटनास्थळावरून पलायन केले. ही घटना 12 ऑक्टोबर रोजी रात्री 9:45 वाजता घडली. मोर्शी तालुक्यातील अंबाडा, सायवाडा ते घाटलाडकी रोडने एका मिनी मालवाहू ट्रकमध्ये 14 गोवंश जातीच्या जनावरांची तस्करी करून कत्तल करण्याच्या उद्देशाने नेत असलेल्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत जवळपास 8 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मध्यप्रदेश येथून जनावरे आणून अवैधरित्या नेण्याचा गोरखधंदा दिवसेंदिवस वाढत चालला असून, 12 ऑक्टोबर रोजी अशाच एका मिनी ट्रकमधून गोवंश कोंबून आणण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मोर्शी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सायवाडा ते घाटलाडकी रोडवरील खेड टी पॉइंटजवळ नाकाबंदी केली. मात्र ही बाब चालक आणि क्लिनरच्या लक्षात येताच त्यांनी जनावरांसह ट्रक 100 मीटर अंतरावर थांबवून घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने पाठलाग केला, पण आरोपी फरार झाले. ट्रकची पाहणी केली असता त्यात 14 गोवंश दोराने बांधून अतिशय क्रूरपणे कोंबलेले आढळले. ट्रकला समोरील नंबर प्लेट नव्हती, मात्र मागील बाजूला एमपी 51/0529 हा नंबर दिसला. सर्व गोवंशांची पशुधन विकास अधिकारी, मोर्शी यांच्या उपस्थितीत तपासणी करून त्यांना देखरेख, पालनपोषण आणि चारा-पाण्यासाठी गौरक्षण संस्था, येरला येथे दाखल करण्यात आले. चार मृत जनावरांवर अंत्यविधीचा सोपस्कार पार पाडण्यात आला. महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला असतानाही मध्यप्रदेश येथून गोवंशांची अवैध वाहतूक सुरू असल्याबद्दल गोरक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी शासनाने या अवैध तस्करीवर कठोर कायदा लागू करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित वाहन चालकांविरुद्ध गोवंश प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर आणि पोहेकॉ संतुलाल उईके यांनी केली.




