अमरावतीत प्रारुप प्रभाग रचनेवर 130 आक्षेप!

अंतिम दिवशीच 70 आक्षेपांची नोंद

-आता जिल्हाधिकार्‍यांच्या सुनावणीकडे लक्ष
अमरावती / 15 सप्टेंबर :  अमरावती महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी निश्चित करण्यात आलेल्या प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांकडून मोठ्या संख्येने आक्षेप नोंदवले गेले आहेत. मनपा प्रशासनाने 3 सप्टेंबर रोजी ही प्रारुप प्रभाग रचना जाहीर करून नागरिकांना आक्षेप व हरकती दाखल करण्याचे आवाहन केले होते. त्या मुदतीत सोमवारी, म्हणजेच 15 सप्टेंबर हा अंतिम दिवस ठरवण्यात आला होता.
या प्रक्रियेत एकूण 130 आक्षेप प्राप्त झाले असून, विशेष म्हणजे अंतिम दिवशी विक्रमी 70 आक्षेप नोंदवले गेले. याआधी शनिवारीपर्यंत केवळ 60 आक्षेप दाखल झाले होते. त्यामुळे अंतिम दिवशी आलेल्या गर्दीमुळे एकूण आकडा 130 वर पोहोचला. सायंकाळपर्यंत मनपा निवडणूक विभागात 117 आक्षेपांची अधिकृत एंट्री करण्यात आली होती, तर शिल्लक राहिलेल्या आक्षेपांच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होती.
या सर्व आक्षेपांवर आता जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने नियुक्त सक्षम अधिकारी सुनावणी घेणार आहेत. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर प्रभाग रचना प्रस्तावावर आवश्यक दुरुस्ती करून नगरविकास विभागामार्फत तो पुन्हा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविला जाईल. त्यानंतर आयोग अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करूनच निवडणुकीची अधिकृत अधिसूचना जाहीर करणार आहे. त्यामुळे अंतिम स्वरूपात प्रभाग रचना कशा प्रकारे समोर येते, यावर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
-कोणत्या प्रभागातून किती आक्षेप?
आतापर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांमध्ये जुनीबस्ती बडनेरा प्रभागातून 21, बेनोडा प्रभागातून 14, रुक्मिणी नगर प्रभागातून 9, जवाहर स्टेडियम प्रभागातून 4 आणि वडाळी प्रभागातून 9 याप्रमाणे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आता निवडणुकीतील इच्छुक आणि राजकीय पक्ष उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, जिल्हाधिकारी स्तरावरील सुनावणीनंतर प्रभागात कितपत बदल घडणार, की 2017 मधील प्रभाग बांधणीचेच हुबेहूब छायाचित्र 2025 मध्ये कायम ठेवले जाणार.

संबंधित बातम्या

Back to top button