विद्युत तारेचा शॉक लागून 13 वर्षीय बालक गंभीर

समर्थ कॉलनी येथील घटना

* अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल

मोर्शी /27 ऑक्टोबर : येथील समर्थ कॉलनीमध्ये अतिउच्च दाबाच्या विद्युत ताराचा स्पर्श होऊन 13 वर्षीय बालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिउच्च दाबाच्या विद्युत तारा हटविण्याची मागणी करत नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले आहे. सविस्तर वृत्त असे की, शहरातील समर्थ कॉलनी परिसरातील अनेक घरांवरून 33 के.व्ही. अतिउच्च दाबाच्या विद्युत ताराद्वारे हिवरखेड येथील विद्युत सबस्टेशनला मोर्शी येथील विद्युत केंद्रातून नियमित वीज पुरवठा केला जातो. समर्थ कॉलनीतील रहिवासी नरेंद्र रामटेके यांच्या घरावरून जाणाऱ्या विद्युत तारेला त्यांचा मुलगा आयुष नरेंद्र रामटेके (वय 13) याने दिवाळीच्या दरम्यान घरावर टाकलेली लाइटिंग काढत असताना स्पर्श झाला, ज्यामुळे तो गंभीररीत्या भाजला.

ही बाब घरच्यांना कळताच आयुषला तातडीने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले. परंतु भाजल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तातडीने अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ही वार्ता समर्थ कॉलनीतील नागरिकांना समजताच त्यांनी वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता विजय कासट यांना निवेदन दिले. समर्थ कॉलनीतून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारा हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली असून पुढे अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास त्यास वीज वितरण कंपनी जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button