100 वर्षांच्या जर्जर इमारतीमुळे जिवितहानीचे संकट

टागोर चौकात मोठ्या दुर्घटनेची शक्यता

-तात्काळ कार्यवाहीची मनपाकडे मागणी
अमरावती / 8 जुलै: शहरातील साबनपुरा परिसरात असलेल्या टागोर चौकातील श्री चंद्रनाथ दिगंबर जैन देवस्थानाची एक अत्यंत जूनी इमारत सध्या जर्जर व क्षतीग्रस्त अवस्थेत धोकादायक पद्धतीने कशीबशी तग धरुन उभी आहे. सततच्या पावसात ही इमारत केव्हाही कोसळण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याने येथे मोठी दुर्घटना घडून जिवितहानीची शकयता नाकारता येत नाही. परिणामी या भागातील जनजीवन संकटात सापडले आहे.
चंद्रनाथ दिगंबर जैन देवस्थानाच्या मालकीची ही बहुमजली इमारत सुमारे 90 ते 100 वर्षांपूर्वीची असावी असा अंदाज आहे. देखभालीअभावी इमारतीच्या भींतींना तडे गेले आहेत. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे इमारत अधिक धोकादायक बनली आहे. इमारतीच्या आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. तसेच येथे अन्य काही मंदिरे असल्याने भाविकांची सतत दर्शनासाठी वर्दळ असते. त्यात महिला आणि लहान मुलांचाही समावेश असतो. इमारतीसमोरील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात रहदारी असते. अशात गर्दीच्या वेळेत ही इमारत कोसळली तर जिवितहानीची शक्यता निर्माण झाली आहे.
स्थानिक रहिवाशांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देउन संभाव्य संकटाबाबत अवगत केले आहे. या इमारतीचे तात्काळ सर्वेक्षण करुन योग्य ती कायदेशिर कारवाई करावी व भविष्यातील संभाव्य गंभीर धोका टाळावा, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने यासंदर्भाने प्राधान्याने पाउले उचलणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button