व्यापार्‍याच्या घरातून 10 लाखांचा मुद्देमाल लंपास

दांपत्य झोपेत, चोरांनी हात साफ केला

-स्वस्तिक नगरातील घटना
अमरावती / 22 ऑगस्ट : बडनेरा रोडलगतच्या स्वस्तिक नगर परिसरात शनिवारी पहाटे व्यापारी गोपाल कासट यांच्या घरात धाडसी चोरी झाली. दांपत्य झोपेत असतानाच त्यांच्या खोलीतील अलमारी उघडून अज्ञात चोरट्याने जवळपास 60 ते 70 ग्रॅम सोनं, एक किलो चांदी, सव्वा लाख रुपये रोख, याशिवाय लेझर मोपेड व मोबाईल असा मिळून दहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
चोरट्याने घराच्या ड्रॉईंग रूममधील खिडकीची ग्रील वाकवून आत प्रवेश केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर शयनकक्षातील अलमारीचे ड्रॉवर काढून नजीकच्या खोलीत प्रवेश केला व तेथेच सर्व ऐवज गोळा केला. रिकामे पर्स आणि वस्तू तिथेच फेकून देऊन चोरटा पसार झाला. गोपाल कासट यांनी सांगितले की, चोरट्याने त्यांच्या पँटच्या खिशातूनच चावी काढून अलमारी शांतपणे उघडली आणि माल उचलला. विशेष म्हणजे, इतक्या जवळ चोरी झाली तरी त्यांना किंवा पत्नीला काहीच आवाज आला नाही. त्यामुळे परिसरात चोरट्याने काही औषधाचा वापर केला का, याबाबत चर्चा सुरू आहे.
गोपाल कासट यांची झोप पहाटे पावणे पाचच्या सुमारास मोडली. अलमारीचे ड्रॉवर उघडे पाहून त्यांनी पत्नीला जागं केलं. शेजारच्या खोलीत सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसलं. खिडकीची ग्रील वाकवलेली दिसल्याने चोरी झाल्याचा खुलासा झाला. त्यांनी तातडीने राजापेठ पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही बोलावण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक एकमेकांना अधिक सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button