1 ब्रास रेतीसह ट्रॅक्टर ट्रॉली ताब्यात; चालकासह तिघे पसार
अवैधरित्या वाळू वाहतूक

-महसूल विभागाची कारवाई
दर्यापूर / 1 ऑगस्ट : दर्यापूर तालुक्यातील विविध भागांमध्ये वाळू घाटाचा अधिकृत लिलाव अद्याप न झाल्यामुळे वाळू उत्खननावर बंदी असतानाही काही ठिकाणी बिनधास्तपणे अवैधरित्या रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे. महसूल प्रशासनाच्या माहितीनुसार, शिरजदा ते खैरी रस्त्यावर शुक्रवारी (दि. 1 ऑगस्ट) दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास महसूल पथकाने अचानक धाड टाकून एक ट्रॅक्टर ट्रॉली 1 ब्रास रेतीसह ताब्यात घेतली.
या कारवाईत ट्रॅक्टरवर कोणताही वाहन क्रमांक नसून, रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली कोणतीही अधिकृत परवानगी संबंधितांकडे नव्हती, अशी माहिती आहे. महसूल विभागाने कारवाई सुरू करताच ट्रॅक्टरचा चालक व त्याच्यासोबत असलेले अन्य तिघे घटनास्थळावरून पळून गेले. या कारवाईत तहसीलदार डॉ. रविंद्रकुमार कानडजे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने संयुक्तपणे कार्यवाही केली. पथकात तलाठी शैलेष चक्रनारायण, तलाठी महेश डोरले, तलाठी अतुल दाळू, तलाठी विश्वनाथ गोंडाणे, तलाठी प्रदीप गीते आणि चालक चक्रधर बेलसरे यांचा समावेश होता. या पथकाने शिरजदा ते खैरी रस्त्यावर गस्त घालताना ही ट्रॅक्टर ट्रॉली अडवली.
सदर ट्रॅक्टर व ट्रॉलीसह रेती जप्त करून पुढील तपासासाठी महसूल कार्यालयात आणण्यात आले असून, ट्रॅक्टर मालकाविरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यात बिनधास्तपणे वाळू उत्खनन करणार्यांमध्ये एक प्रकारची धास्ती निर्माण झाली असून, महसूल प्रशासनाच्या पुढील कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




