नांदगाव पेठेत युवकांचा थरार आणि क्रीडा कौशल्याचा जागर

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत युवा शक्तीचा एल्गार

* वीर केसरी मैदानावर रंगला क्रीडा महोत्सव

अमरावती /17 फेब्रुवारी : युवा पिढीमध्ये खेळाची आवड निर्माण करून त्यांचे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य सुदृढ करण्याच्या उद्देशाने, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या ’मेरा युवा भारत’ केंद्र अमरावती व वीर केसरी क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव पेठ येथे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 15 ते 29 वयोगटातील युवक-युवतींच्या उत्स्फूर्त सहभागाने वीर केसरी मैदान खेळाडूंच्या जिद्दीने आणि चिकाटीने न्हाऊन निघाले होते. ग्रामीण व शहरी भागातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणार्‍या या सोहळ्यात कबड्डी, खो-खो आणि मैदानी स्पर्धांच्या माध्यमातून युवा शक्तीचा आविष्कार पाहायला मिळाला. नांदगाव पेठ येथील वीर केसरी मैदानावर आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन नरसिंगपूरचे पोलीस पाटील प्रवीण वानखेडे, अमरावती तालुका काँग्रेस ग्रामीण सचिव डॉ. पंकज अभ्यंकर, वीर केसरी क्रीडा मंडळाचे संचालक दिनकरभाऊ सुंदरकर, निलेशभाऊ रघुवंशी, अजय दादा गोरले, खो-खो संघाचे शिक्षक खंडार सर, राऊत मॅडम आणि घुले मॅडम यांच्या उपस्थितीत झाले. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि बजरंग बली यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्पर्धेत मुला-मुलींच्या गटामध्ये चुरस पाहायला मिळाली. महिलांच्या 100 मीटर धावण्यात भुवनेश्वरी आखरे हिने प्रथम, मानवी भांभुरकर हिने द्वितीय तर श्रावणी नेवारे हिने तृतीय क्रमांक पटकावला. गोळाफेक स्पर्धेत मानवी परवी प्रथम, परिधी कापडे द्वितीय आणि भविका सनके तृतीय आली. पुरुषांच्या 100 मीटर धावण्यात आदित्य पातशे याने बाजी मारली, तर अझहर शाह आणि दुर्गेश सोनलेकरे अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी राहिले. ’मेरा युवा भारत’ केंद्राच्या स्नेहल बासुतकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. प्रास्ताविक आदित्य पातसे यांनी केले तर आभार प्रवीण वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सौरभ बैस, अभिषेक पोहनकर, सतीश वाघमारे, जय कठाने, सुरेंद्र वाघमारे, संघर्ष नाईक, विशाल वासनिक, अमित थोरात, वैभव खंडारे, पवन पळसकर, अभिषेक शेंदरकर आणि ओम डोईफोडे यांसह वीर केसरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.

संबंधित बातम्या

Back to top button