क्रिकेटच्या खेळात एचव्हीपीएम संघाने मारली बाजी
यवतमाळच्या संघाला नमवून पटकावले विजेतेपद

पियुष खोपे ठरला अंतिम सामन्याचा महानायक
अमरावती /18 फेब्रुवारी : स्थानिक श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, रामपुरी कॅम्पच्या मैदानावर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘सीसीए टी-20 ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेचा समारोप अत्यंत चुरशीच्या वातावरणात पार पडला. अंतिम लढतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या (एचव्हीपीएम) संघाने यवतमाळच्या संघाचा पराभव करून 41 हजार रुपयांच्या रोख बक्षीसासह विजेतेपदावर आपले नाव कोरले. पियुष खोपेची तुफानी फलंदाजी आणि केशव शर्माची अष्टपैलू कामगिरी या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरली.
क्रिकेट खेळाडू क्रिकेट अकादमी (सीसीए) द्वारे आयोजित या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एकूण 8 नामांकित संघांनी आपला सहभाग नोंदवला होता. महिनाभर चाललेल्या या क्रिकेटच्या महाकुंभात खेळाडूंचा उत्साह आणि प्रेक्षकांची गर्दी ओसंडून वाहत होती. 15 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या अंतिम सामन्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना यवतमाळच्या संघाने निर्धारित षटकांत 171 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. मात्र, विजयाचा निर्धार करून मैदानात उतरलेल्या एचव्हीपीएमच्या संघाने 19 व्या षटकातच केवळ 5 गडी गमावून हे लक्ष्य साध्य केले आणि ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयाचा खरा शिल्पकार पियुष खोपे ठरला. त्याने केवळ 52 चेंडूंमध्ये 71 धावांची वादळी खेळी करून सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला ’सामनावीर’ आणि स्पर्धेतील ’सर्वोत्कृष्ट फलंदाज’ म्हणून गौरविण्यात आले. तसेच, संपूर्ण स्पर्धेत भेदक मारा करणारा प्रेम गोळे ’सर्वोत्कृष्ट गोलंदाज’ ठरला. या स्पर्धेतील एकमेव शतक झळकावणार्या केशव शर्माला ’मालिकावीर’ (प्लेअर ऑफ द टूर्नामेंट) हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्या संघाला 41 हजार रुपये, तर उपविजेत्या यवतमाळ संघाला 15 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रिकेट खेळाडू क्रिकेट अकादमीचे संचालक मयूर कामडी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि परिश्रम लाभले.




