राणा सोबत असतील तर भाजपाशी युती नकोच

आ. संजय खोडकेंचा राणा दांपत्यावर निशाना

-जातीय तेढ निर्माण करित असल्याची टीका
-महापालिका निवडणुकीबाबत मांडली भूमिका
अमरावती / 18 मे: राज्यात आता आगामी महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्येही राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि विधानपरिषदेचे आमदार संजय खोडके यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुकीचं वारे वाहायला लागलं असताना अमरावती महापालिकेत भाजपाशी युतीचा वरच्या स्तरावर निर्णय जरी होत असेल, तरी अमरावतीत राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार. त्यांच्यासोबत आमचं ताळमेळ बसूच शकत नाही, असं संजय खोडके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.
भाजपाशी संबंधित इतर घटक संघटना या जाती आणि धर्मात द्वेष निर्माण करणार्‍या असल्या तरी भाजपा सर्वांना सामावून घेणारा पक्ष आहे. अमरावतीत भाजपाचे इतर मित्र हे दोन धर्मात तेढ निर्माण करणारे आहेत, अशी टीका संजय खोडके यांनी केली. तसंच, राणा सोबत असतील तर आम्ही भाजपासोबत युतीचं करणार नाही, असं देखील संजय खोडके म्हणाले. याचबरोबर, भाजपाच्यावतीनं महापालिका निवडणूक स्वतंत्र लढण्याबाबत बोललं जात असताना आमचे नेते अजित पवार यांनीही काल परवा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्यास सज्ज आहोत असं जाहीर केलं आहे. राज्यात सत्तेवर असणार्‍या महायुतीतील तिन्ही पक्ष जर महापालिका निवडणुकीत एकत्र येत असतील तर अमरावतीत राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष आमच्यासोबत अजिबात चालणार नाही. ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असं देखील संजय खोडके यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

Back to top button