कर्जमुक्तीसाठी नांदगावातील शेतकरी आक्रमक
तहसिलवर मोर्चा, हजारो अर्ज सादर

नांदगाव खंडेश्वर / 16 मे : विधानसभा निवडणूक काळात कर्जमुक्तीचे दिलेले आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीतील अन्य नेत्यांनी सत्तत आल्यानंतर पाळले नसल्याने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेतकरी आज आक्रमक झालेले पाहायला मिळाले. शेकडो शेतकर्यांनी शिवसेना उबाठाचे नेते प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक दिली आणि कर्जमाफीसाठी लेखी अर्ज सादर केले. यावेळी शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळालीच पाहिजे, मुख्यमंत्री फडणवीस मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी या आंदोलनाचे आवाहन केले होते. त्याला नांदगाव खंडेश्वर येथे शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप महायुतीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकर्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकर्यांनी या आश्वासनावर विश्वास ठेवून महायुतीचे आमदार निवडून दिले. मात्र आता सत्ता येताच शेतकर्यांच्या कर्जमाफीकडे दुर्लक्ष केले आहे. ही शेतकर्यांची फसवणूक असून सरकारकडून आर्थिक संकटात असलेल्या शेतकर्यांची पिळवणूक केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
तहसिलदारांना निवेदन तसेच कर्जमाफीची मागणी करणारे अर्ज सादर करण्यात आले. यावेळी प्रकाश मारोटकर, अमोल पकडे, विनोद रावेकर, सुनील गुरमुळे, तुळसीदास जेठे, सूरज लोमटे, दिनेश धवस, श्रीकृष्ण सोळंके, मोरेश्वर परळीकर, लोकेश बिटले, रमेश उडबगले, विजय पेटले, प्रवीण सुने, कान्तेश्वर शिरभाते, सुरेंद्र गावडे, शेख मेहबूब, लीलाधर चौधरी, रवी ठाकूर, प्रकाश ब्राम्हणवाडे, प्रमोद डकरे, मारोती मडके, शंकर मांडवगडे, राजेंद्र ढोके, कैलास रावेकर, प्रकाश बनकर, महेंद्र भेंडरकार यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.