सरन्यायाधीशांचे उत्साहपूर्ण स्वागत…

अमरावती/दि,25 जुन: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आज दुपारी 2 वाजता विशेष विमानाने अमरावती विमानतळावर आगमन झाले. मुळ अमरावतीकर असलेले न्या. भूषण गवई हे सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यानंतर अमरावती वकिल संघाच्या वतीने आयोजित सन्मान समारंभाला उपस्थित राहण्यासाठी प्रथमच शहरात आले होते. यावेळी त्यांचे विमानतळावर आणि काँग्रेस नगर स्थित त्यांच्या ‘कमलपुष्प’ निवासस्थानी उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. घरी पोहोचताच भूषण गवई यांनी मातोश्री कमलताई गवई यांना चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेतले. विमानतळावर खासदार बळवंत वानखडे यांच्यासह विभागीय आयुक्त श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरिक्षक रामनाथ पोकळे, माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी संजीता मोहपात्रा यांनी सरन्यायाधीशांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांनी लाकडापासून तयार केलेली संविधानाच्या उद्दीशिकेची नक्षीदार कलाकृती न्या. गवई यांना भेट दिली.




