अप्पर वर्धा धरणावर युवकाची नदीत उडी

पर्यटकांची तत्परता, सुखरुप बाहेर काढले

-आत्महत्येचा प्रयत्न की पोहण्याचा प्रयोग?
मोर्शी / 14 सप्टेंंबर : अप्पर वर्धा धरण परिसरात आज रविवारी, 14 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. आसोना (ता. मोर्शी) येथील जयहरी गुलाबराव निकम (वय 37) या युवकाने धरण परिसरातील पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तेथे धरणाचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी आलेल्या काही युवकांनी तत्परतेने धाव घेत त्याला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याचे प्राण वाचविण्यात यश मिळवले.
पाण्यात पडल्याने नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे जयहरी निकम बेशुद्ध झाला होता. घटनास्थळाची माहिती मिळताच मोर्शीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चिंचोले, रामकिसन नांदगावकर, पो. कॉ. वैभव ठाकरे व अथर्व कोहळे यांनी तात्काळ धाव घेत त्याला उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रथमोपचार करून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुढील उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
घटनेतील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जयहरी निकम याने नदीत उडी घेण्यापूर्वी आपले मोबाईल व पैशांचे पॉकेट पॅन्टमधून काढून ठेवले होते. त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला की फक्त पोहण्यासाठी उडी घेतली, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. सदर घटना आष्टी पोलीस स्टेशन हद्दीत घडल्यामुळे पुढील तपास आष्टी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. धरण परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने होमगार्डची नेमणूक करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये खळबळ उडाली होती. युवकाचे प्राण वाचविणार्‍या पर्यटकांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button