वरुड तालुक्यात भीषण अपघात : पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर
दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक

-अन्य दुचाकीवरील प्रवासीही जखमी
वरुड / 14 सप्टेंबर : वरुड तालुक्यातील पंढरी गावाजवळ घडलेल्या अपघातात जरुड येथील प्रमोद मधुकर धर्मे (46) यांचा मृत्यू झाला असून त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. दुसर्या दुचाकीवरील प्रवासी जखमी झाले असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जरुड येथील गाडगेनगर परिसरातील प्रमोद धर्मे हे पत्नी मंगला यांच्यासोबत मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथे जात होते. त्यांच्या एम.एच.27 एबी 3967 या दुचाकीला पंढरीजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव आणि अनियंत्रित दुचाकी (क्रमांक एम.एच.27 बीएच 4794) ने जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.
अपघातग्रस्तांना स्थानिकांनी तत्काळ वरुड ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रमोद धर्मे व त्यांची पत्नी मंगला यांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही अमरावती येथील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान प्रमोद धर्मे यांचे निधन झाले. सध्या पत्नी मंगला धर्मे यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी प्रमोद धर्मे यांच्या पार्थिवाचे अमरावती येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करून गावात आणण्यात आले. जरुड येथील हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई व भाऊ असा आप्तपरिवार आहे.
दुसर्या दुचाकीवरील जखमींविषयी ठोस माहिती वृत्त लिहीपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. या अपघातासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.




