पेरण्या आटोपल्यानंतर डीएपी व युरियाचा तुटवडा

शेतकर्‍यांसमोर आता नवे संकट

-उत्पादन घटणार?, शासनाप्रती असंतोष
-क्रुर थट्टा चालविल्याची भावना
मोर्शी / 12 जुलै: गेल्या काही दिवसांतील समाधानकारक पावसानंतर खरीप हंगामात शेतकर्‍यांच्या पेरणीची कामे जवळपास आटोपली आहेत. अशात आता शेतकर्‍यांना पिकासाठी डीएपी व युरिया खतांची आवश्यकता असून, त्याची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात आहे. मात्र या खतांच्या तुटवड्यामुळे शेतकर्‍यांसमोर आता नवे संकट उभे राहीले आहे. यासंदर्भाने प्रशासन आणि कंपन्यांमध्ये समन्वयाचा पूर्णत: अभाव जाणवतो. खते उपलब्ध करुन देण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न होताना दिसत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. त्यांच्यात असंतोष निर्माण झाला असून शासन व कंपन्यांनी बळीराजाची क्रूर थट्टा चालविली असल्याचा आरोप केला जात आहे.
मोर्शी तालुक्यातील पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. आता पिकांना डीएपी व युरिया खत दिले जाणे आवश्यक आहे. मात्र मोर्शी शहरासह तालुक्यातील नेर पिंगळाई, राजूरवाडी, अंबाडा, हिवरखेड या परिसरात पुरेशा प्रमाणात ही खते उपलब्ध नाहीत. खतांसाठी पायपीट करुनही ते मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. अशातच कंपनी आणि प्रशासनाकडून दिल्या जाणार्‍या सूचनांमध्ये तफावत असल्याने शेतकर्‍यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण केली आहे. कंपनी लिंकींग करा असे म्हणते, तर कृषी अधिकारी लिंकिंगला नाही म्हणा असे सांगतात. अशा परिस्थितीत काय करावे, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे.
पिकांना वेळेवर खतांची मात्रा होणे सध्या गरजेचे आहे. तसे झाले नाही तर उत्पादन क्षमतेत घट होण्याची श्यक्यता निर्माण झाली आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी बँकेचे व सावकारी कर्ज घेऊन पेरणी केली आहे. आता पिकासाठी ज्या खतांची गरज आहे तेच उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्‍यांसमोरील संकटांचे दुष्टचक्र कायम असल्याचेच दिसून येत आहे. अशा प्रकारांमुळे उत्पादन घटल्यास कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता त्यांना आत्तापासूनच भेडसावत आहे. त्यातून शेतकरी आत्महत्येची समस्या आणखीन गंभीर बनण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. एकीकडे कंपन्यांची अरेरावी आणि दुसरीकडे शासनाकडून मदतीचा अभाव अशा दुर्दैवी फेर्‍यात शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या पुरता भरडला जात आहे. ही परिस्थिती शेतकर्‍यांमध्ये शासनाप्रती असंतोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरत आहे.
-खतांची उपलब्धता अत्यंत कमी
याबाबत मोर्शी कृषी विक्रेता संघाचे अध्यक्ष सुहास ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या हंगामात डीएपी आणि युरिया या खतांची उपलब्धता अतिशय कमी असल्याचे सांगितले. ही खते घेतांना उत्पादक कंपनीकडून दुसरी उत्पादने लिंकिंग केली जात आहे. परंतू विक्रेता अशी खते घेण्यास इच्छुक नाहीत. लिंकिंगची ही समस्या सोडविण्यासाठी अमरावती जिल्हा कृषी विभाग प्रयत्नशील असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

Back to top button