‘ऑपरेशन सिंदूर’ दबावाखाली थांबवले नाही
आमची कृती पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ

-राजनाथ सिंहांचे लोकसभेत स्पष्टीकरण
-विरोधकांसह पाकिस्तानला सुनावले खडे बोल
नवी दिल्ली/ 28 जुलै : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात कामकाजात वारंवार व्यत्यय आणल्यानंतर सोमवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चा झालीय, ज्यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रतिसाद म्हणून सुरू करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण लष्करी आणि राजनैतिक कारवाई असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांसह पाकिस्तानला खडे बोल सुनावलेत.
ऑपरेशन सिंदूरवरील लोकसभेत चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, आमची कारवाई पूर्णपणे स्वसंरक्षणार्थ होती, ती चिथावणी देणारी किंवा विस्तारवादी नव्हती. 10 मे 2025 रोजी पहाटे 1:30 वाजता पाकिस्तानने क्षेपणास्त्रे, ड्रोन, रॉकेट आणि इतर लांब पल्ल्याच्या शस्त्रांचा वापर करून भारतावर मोठा हल्ला केला. आमच्या सशस्त्र दलांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये 9 दहशतवादी पायाभूत सुविधांच्या लक्ष्यांवर अचूकतेने मारा करण्यात आलाय. या लष्करी कारवाईत अंदाजे 100 हून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक, हँडलर आणि सहकारी मारले गेलेत. यापैकी बहुतेक जण जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते.
पहलगाम हल्ल्यानंतर लागलीच आपल्या सशस्त्र दलांनी कारवाई केली आणि 9 दहशतवादी अड्ड्यांवर अचूक हल्ला केला. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी, त्यांचे प्रशिक्षक आणि हँडलर मारले गेले, असंही लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणालेत. विरोधी पक्षातील काही सदस्य विचारत आहेत की आमची किती विमाने पाडण्यात आली? मला वाटते की त्यांचा प्रश्न आमच्या राष्ट्रीय भावनांचं पुरेसे प्रतिनिधित्व करीत नाही. आमच्या सशस्त्र दलांनी किती शत्रू विमाने पाडल्याचं ते विचारात आहेत. जर त्यांना प्रश्नच विचारायचा असेल तर त्यांनी भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे नष्ट केले का? असं विचारावं आणि उत्तर हो असेल. ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाले का हा प्रश्न विरोधकांनी विचारावा. त्याचेही उत्तरही हो आहे. दहशतवाद्यांच्या म्होरक्यांना नेस्तनाबूत केले का? त्याचे उत्तरही होच असेल. या कारवाईत आपल्या एकही जवानाला दुखापत झालेली नसल्याचंही त्यांनी अधोरेखित केलंय.
आपली एस-400, आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, हवाई संरक्षण तोफा खूप निर्णायक ठरल्या आहेत आणि त्यांनी पाकिस्तानचा हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला.’ भारताने आपली कारवाई थांबवली, कारण देशाची पूर्वनिर्धारित राजकीय आणि लष्करी उद्दिष्टे पूर्ण झालीत. कोणत्याही दबावाखाली ही कारवाई थांबवण्यात आलेली नाही, तसेच असे म्हणणे निराधार आणि पूर्णपणे चुकीचे आहे.
…तर कारवाई पुन्हा सुरू करणार
ऑपरेशन सिंदूरबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, 10 मे रोजी जेव्हा भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या अनेक हवाई तळांवर हल्ला केला, तेव्हा पाकिस्तानने पराभव स्वीकारला आणि युद्धबंदीची ऑफर दिली. हा प्रस्ताव या अटीवर स्वीकारण्यात आला की, ही कारवाई फक्त थांबवण्यात आलीय. भविष्यात जर पाकिस्तानकडून काही आगळीक झाली तर ही कारवाई पुन्हा सुरू केली जाणार आहे.




