राज्यात नैसर्गिक शेती मिशन राबवणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

मुंबई /24 ऑक्टोबर : राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेती मिशन सुरू केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (24 ऑक्टोबर) केली. नैसर्गिक शेती मिशनमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल, तसेच उत्पादकता वाढून जमिनीची क्षमता आणि कस सुधारेल, त्यामुळे शेती अधिक फायदेशीर होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी राजभवन येथे राज्यातील मंत्री, आमदार आणि खासदारांसाठी ‘नैसर्गिक शेती’ विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वातावरण बदलाचा शेतीवर परिणाम होत असून उत्पादकता कमी होते आणि उत्पादन खर्च वाढतो. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणजे नैसर्गिक शेती. त्यामुळे राज्यपालांच्या नेतृत्वाखाली राज्यात नैसर्गिक शेती मिशन सुरू केले जात आहे. यासोबतच शेतकऱ्यांसाठी कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्याचीही माहिती त्यांनी दिली. यंदा राज्यात कापूस आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असून, शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेला माल या केंद्रांवर विकावा, असे आवाहन त्यांनी केले. खासगी व्यापारी हमीभावानेच माल विकत घेत असल्यासच शेतकऱ्यांनी त्यांना विकावे, असेही त्यांनी सांगितले.

कापूस आणि सोयाबीन खरेदीसाठी येत्या 30 तारखेपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना विनंती आहे की कुणीही हमीभावापेक्षा कमी भावात माल विकू नये. राज्य सरकार सर्व शेतमालाची नोंदणी करेल आणि खरेदी करेल. त्यासाठी नाफेड, केंद्र सरकार आणि राज्याच्या पणन विभागाने राज्यभर खरेदीचे मोठे जाळे निर्माण केले असून, सीसीआयसोबतही करार केला आहे. शेतकऱ्यांनी सरकारकडे नोंदणी करून सरकारी केंद्रांवरच आपला माल विकावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Back to top button