स्वच्छता-सौंदर्यिकरणासाठी मनपा आयुक्त सौम्या शर्मा सक्रिय
विविध भागांत भेट देवून पाहणी

-डस्टबिन नसल्यास दंडात्मक कारवाई
-आरोग्य व्यवस्थापनासाठी महत्वाचे निर्देश
अमरावती / 24 जून: अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा यांनी मंगळवार, 24 जून रोजी शहरातील वडाळी परिसर, चपराशीपुरा रोड, डेपो रोड, चौधरी चौक, विलास नगर व कॅम्प रोड परिसराची पाहणी केली. या दौर्यादरम्यान त्यांनी संबंधित अधिकार्यांशी चर्चा करत शहर स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचे निर्देश दिले. शहरातील रस्त्यांची नियमित साफसफाई, गटारांची देखभाल, पादचारी मार्गांवरील माती हटवणे, झाडे लावणे, बांधकाम साहित्याचे नियोजन आणि फुटपाथ स्वच्छ ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्लॉट धारकांना नोटीस देणे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य घेऊन परिसराचे सौंदर्यीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्वच्छता कंत्राटदारांना स्पष्टपणे बजावले की, घंटागाडीने प्रत्येक नागरिकाच्या घरी जावेच लागेल. त्याचप्रमाणे, घनकचरा संकलनाचे वेळापत्रक स्थानिक गरजेनुसार निश्चित करावे आणि नाल्यांतील कचरा वेळेवर काढावा. स्वास्थ निरीक्षकांना आपापल्या प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी नियमितपणे पार पाडण्याचे आदेश देण्यात आले. मनपा राजापेठ कोठा येथून नोटीस बुक घेऊन फेरीवाले, दुकानदार, हॉकर्स यांना डस्टबिन न ठेवणे किंवा इतरत्र कचरा फेकणे यासंदर्भात नोटिसा द्याव्यात, तसेच दररोज याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
शहरातील हॉकर्स धारक आणि आस्थापनांना डस्टबिन ठेवणे आता बंधनकारक असून, उघड्यावर कचरा फेकणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. शहर स्वच्छ व सुंदर व्हावे यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले. नागरिकांनी कचरा योग्य ठिकाणीच टाकावा आणि स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात, असे आयुक्त सौम्या शर्मा यांनी स्पष्ट केले. या दौर्यात वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, सहाय्यक आयुक्त नितीन बोबडे, जेष्ठ स्वास्थ निरीक्षक कुंदन हडाले, अमरावती शहर समन्वयक श्वेता बोके, स्वास्थ निरीक्षक, साफ सफाई कंत्राटदार, मनपा कर्मचारी उपस्थित होते. शहरात स्वच्छतेसाठी मनपा प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ अमरावतीचा संकल्प हक्काचा होणार, हे या पाहणी दौर्याने अधोरेखित झाले आहे.
———–




