मनपाच्या सर्वांगीण विकासासाठी महापौरांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक
स्वच्छता, प्रधानमंत्री आवास, ई-बस, नव्या बाजारपेठा व आर्थिक स्थितीवर चर्चा

अमरावती /10 फेब्रुवारी : शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी मा. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी मंगळवार, दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत शहराशी निगडित विविध विकासात्मक, आर्थिक व नागरी सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत स्वच्छता व्यवस्था, प्रधानमंत्री आवास योजना, ई-बस सार्वजनिक वाहतूक सेवा, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती, मालमत्ता कर वसुली, महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत, झोन कार्यालयांची कार्यप्रणाली, ट्रान्सपोर्ट नगर येथे नवीन मार्केटची उभारणी तसेच बडनेरा येथील सोमवार बाजार येथे नव्याने बाजारपेठ विकसित करण्याबाबत आढावा घेण्यात आला. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी प्रत्येक मुद्द्यावर संबंधित अधिकार्यांकडून सविस्तर माहिती घेतली. शहरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबवावी, प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना वेळेत घरे मिळावीत, ई-बस सेवेद्वारे नागरिकांना सुरक्षित व पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी, यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी मालमत्ता कर वसुली प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या. ट्रान्सपोर्ट नगर व बडनेरा येथील बाजारपेठा विकसित झाल्यास स्थानिक व्यावसायिकांना चालना मिळेल तसेच नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध होतील, असे मत यावेळी महापौरांनी व्यक्त केले. सर्व विकासकामे नियोजनबद्ध पद्धतीने व ठराविक कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले. महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी महत्त्वपूर्ण सूचना दिल्या की, शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम व प्रभावीपणे राबवावी. कचरा संकलन, वर्गीकरण व विल्हेवाट यामध्ये नियमित देखरेख ठेवून स्वच्छतेबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रधानमंत्री आवास योजनेतील सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा देण्यात यावा व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करावा. ई-बस सेवा अधिक प्रभावी व नागरिकाभिमुख करण्यासाठी मार्गांचे नियोजन करावे. महानगरपालिकेची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवावे व उत्पन्नवाढीचे स्त्रोत वाढविण्याबाबत योग्य नियोजन करावे. मालमत्ता कराची थकबाकी वसुली प्रभावीपणे करावी. नागरिकांना सुलभ सुविधा देऊन कर भरण्यास प्रोत्साहन द्यावे. महानगर पालिकेच्या नवीन इमारतीच्या कामाचा आराखडा व अंमलबजावणी तातडीने पूर्ण करावी व कामात गुणवत्ता व पारदर्शकता राखावी. झोन कार्यालयांमधील कामकाज अधिक गतिमान व नागरिकाभिमुख करावे. नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश देण्यात आले. ट्रान्सपोर्ट नगर परिसरात नवीन बाजारपेठ उभारण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया तातडीने सुरू कराव्यात. व्यापार्यांच्या सोयी लक्षात घेऊन नियोजन करावे. बडनेरा येथील सोमवार बाजार येथे नवीन मार्केट उभारणीबाबत सविस्तर आराखडा तयार करून लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. सर्व विभागांनी आपापल्या कामांचा नियमित आढावा घ्यावा व प्रगती अहवाल सादर करावा, अशा स्पष्ट सूचना मा. महापौरांनी दिल्या. या बैठकीस उपमहापौर सचिन भेंडे, अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, गटनेता चेतन गावंडे, गटनेता अविनाश मार्डीकर, गटनेता नाना आमले, गटनेता राजेंद्र तायडे, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ.अजय जाधव, सहाय्यक नगर रचनाकार कांचन भावे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, मालमत्ता अधिकारी सचिन मांडवे, मनपा कर्मचारी उपस्थित होते.




