मनपा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर मैदानात

अमरावतीत शेवटच्या क्षणी भाजप-शिंदे गटाची युती फिस्कटली

* बंडखोरांच्या मनधरणीसाठी तारेवरची कसरत
* शेवटच्या दिवशी उमेदवारी जाहीर केल्याने उडाला गोंधळ

अमरावती /31 डिसेंबर : महापालिका निवडणुकीच्या अंतिम दिवशी सर्वच प्रमुख पक्षांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी उमेदवार जाहीर करून प्रत्येक पक्षाने स्वबळावर लढण्याची हुंकार भरली. महायुती तुटली असून महाआघाडीही स्थिर झालेली नाही, त्यामुळे उमेदवारांची पळवापळवी, बंडखोरी आणि राजकीय नाट्य रंगतदार रूपात दिसून आले.
भाजपाने एकूण 75 जागांपैकी 69 जागांवर उमेदवार जाहीर केले असून काही जागा युवा स्वाभिमान पक्षाला दिल्याची चर्चा आहे. 28 नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली, तर 12 मुस्लिमबहुल जागांवर उमेदवार दिला नाही. काँग्रेसने 73 उमेदवार जाहीर केले असून जास्तीस – जास्त जुन्याच नगरसेवकांना पुन्हा तिकीट दिली आहे, तसेच 14 जागा मित्रपक्षांना सोडल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने 82 उमेदवार जाहीर केले असून जुन्या व नव्या उमेदवारांचा समन्वय साधला आहे. शिवसेना (शिंदे गट)ने 69 उमेदवार जाहीर केले, ज्यात स्वपक्षीय तसेच इतर पक्षातून आलेले इच्छुकांचा समावेश आहे. युवा स्वाभिमान पक्षाने 41 उमेदवार जाहीर केले, ज्यात तीन नगरसेवक पुन्हा मैदानात आहेत, तसेच काही बाहेरून आलेले उमेदवारही उतरविले आहेत. उमेदवारी न मिळाल्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये नाराजी व बंडखोरीची नाट्यमय परिस्थिती पाहायला मिळत आहे. काही इच्छुकांनी दुसर्‍या पक्षांकडे धाव घेतली, तर काही जण शांत राहणे पसंत करत आहेत. भाजपात नाराजी अधिक तीव्र होती; अनेकांनी संताप व्यक्त केला, तर काहीजण अश्रु अनावर झाले. काँग्रेसमध्येही नाराजी दिसली, तर शिंदे गटातही इच्छुकांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते, तर इतर पक्षात तीव्रतेने नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत सर्व पक्षांनी एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन रणनिती आखली. अर्ज छाननी व मागे घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत काही बदल होऊ शकतात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे – अमरावती महापालिकेतील निवडणूक स्वबळावर लढाई, बंडखोरी आणि रंगतदार राजकीय नाट्य दाखवून देणार आहे. विजयी उमेदवार ठरल्यावरच शहराच्या राजकीय भविष्याचा आराखडा स्पष्ट होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button